सांगोला – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकत्याच जाहीर केलेल्या निकालामध्ये सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथील श्वेता सखाराम पवार हिची खेळाडू कोट्यातून पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. या यशाबद्दल सां.ता.शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष प्रा.पी.सी.झपके यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. श्वेता पवारचे प्राथमिक शिक्षण वाटंबरे येथे तर माध्यमिक शिक्षण सांगोला विद्यामंदिर प्रशालेत झाले. यावेळी क्रीडा शिक्षक सचिन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तिने इ.८ ते १० वी दरम्यान विविध स्तरांवरील बॉक्सिंग स्पर्धेत सहभागी होऊन यश मिळविले होते. पुढे १२ वी पर्यंतचे शिक्षण जय हिंद कॉमर्स कॉलेज पिंपरी येथे तर पदवी पर्यंतचे शिक्षण बृहन् महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे येथे घेतले.
सन २०१९ मध्ये झालेल्या ७२ व्या विद्यापीठांतर्गत राष्ट्रीय स्पर्धेत तिने बॉक्सिंग क्रीडा प्रकारात कांस्यपदक मिळविले. एमपीएससीच्या २०२५ च्या परीक्षेमधून तिने महसूल सहाय्यक या पदाला गवसणी घालत पुणे शहराच्या उपनिबंधक कार्यालयात ती सध्या कार्यरत आहे. पुढे एमपीएससीच्या माध्यमातून तिने खेळाडूंच्या कोट्यातून सहाय्यक पोलीस निरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. माझ्या मुलीने मोठे कष्ट घेऊन आपल्या आवडीच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवण्याचा मनस्वी आनंद होत असून अभिमान आहे अशी भावना तिचे वडील सखाराम पवार यांनी व्यक्त केली.
खेळाडूंनाही उत्तम नोकरीच्या संधी
गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांबरोबरच खेळाडूंनाही राखीव जागांच्या माध्यमातून नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. मात्र त्यासाठी आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहून प्रयत्नांमध्ये सातत्य राखले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपले योग्य प्रयत्न पालकांच्या लक्षात आणून द्यावेत आणि पालकांनी मुलांना संधी द्यावी. सांगोला विद्यामंदिर प्रशालेत राबविले जाणारे विविध उपक्रम आणि क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची मिळणारी संधी यातून आपल्याला योग्य प्रकारे क्रीडा कौशल्य अवगत झाली.
-श्वेता पवार, नूतन पोलीस उपनिरीक्षक
























