सोलापूर – जनता सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मात्र, अपेक्षेप्रमाणे मतदारांचा प्रतिसाद न मिळाल्याने मतदानाचा टक्का अत्यंत कमी राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिबंधक किरण गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीत केवळ ११.०२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
एकूण ५१ हजार ४९४ मतदारांपैकी फक्त ५ हजार ६७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग मंद होता. काही ठिकाणी दुपारनंतर थोडाफार प्रतिसाद वाढला असला तरी एकूणच मतदारांचा उत्साह कमीच राहिला. त्यामुळे निवडणुकीत अपेक्षित टक्का गाठण्यात अपयश आले.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने व्यापक तयारी केली होती. जिल्हाभरात मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा, कर्मचारी आणि पोलिस बंदोबस्ताची योग्य व्यवस्था करण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडल्याचे प्रशासनाने सांगितले.
दरम्यान, कमी मतदानामुळे विविध राजकीय गट-तटांच्या गणितात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडीवर या मतदानाचा थेट परिणाम होणार असल्याने मतमोजणी आणि निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता निकाल जाहीर झाल्यानंतरच बँकेतील पुढील सत्तासमीकरण स्पष्ट होणार असून, कोणत्या गटाला मतदारांचा कौल मिळाला हे लवकरच समोर येणार आहे.























