सोलापूर : एस. व्ही. सी. एस. हायस्कूल, क्र. ८४, भवानी पेठ सोलापूर येथे २० मार्च रोजी जागतिक चिमणी दिन मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राम ढाले होते. तसेच उपमुख्याध्यापक रामेश्वर झाडे, पर्यवेक्षक महादेव वांगीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या सुंदर सूत्रसंचालनाने झाली. सातवी ‘अ’ मधील चि. नागेश खांडेकर व कु. श्रावणी माकणे यांनी प्रभावी सूत्रसंचालन करत कार्यक्रमाची रंगत वाढवली.
अध्यक्षीय मनोगतामध्ये ढाले यांनी चिमण्यांचे पर्यावरणातील महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, चिमण्या या परिसंस्थेचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून त्यांच्यामुळे कीटक नियंत्रण, पर्यावरण संतुलन राखले जाते. तसेच आधुनिक जीवनशैलीमुळे चिमण्यांची संख्या कमी होत असल्याची खंत व्यक्त करत विद्यार्थ्यांनी पाणी ठेवणे, धान्य टाकणे, झाडे लावणे व पक्ष्यांप्रती संवेदनशीलता बाळगणे अशा चांगल्या सवयी आत्मसात करण्याचे आवाहन केले.
या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. चिमणी दिन विशेष नाटक चि. नागेश खांडेकर, कु. श्रावणी माकणे, अथर्व धप्पाधुळे व विजयालक्ष्मी सपाने यांनी सादर केले. तसेच चिमणी दिन आत्मकथन ईश्वरी काळे, भाषण श्रावणी बिराजदार, ओवी “खोप्या मंदी खोपा” कार्तिकी दरेकर व “हरवलेली चिमणी” ही कविता वैष्णवी बिराजदार यांनी प्रभावीपणे सादर केली.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक घरट्यांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. या घरट्यांचे निरीक्षण करून प्रमुख पाहुणे, मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.























