पंढरपूर – श्री विठ्ठलाच्या दर्शनाला आलेले भाविक विठ्ठलाचा प्रसाद म्हणून खास येथील खव्याचे पेढे खरेदी करतात. यामुळे पंढरपुरात पेढ्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.सध्या गॅसची टंचाई भासत असल्यामुळे याचा परिणाम पेढे तयार करण्यावर झाला असून गॅस मिळत नसल्यामुळे येथील पेढे उत्पादक व्यापाऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर पेढा तयार करणाऱ्या कारखान्यामधील सुमारे पाचशे ते हजार कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे.
पंढरपूर हे राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनाला दररोज सुमारे ५० ते ६० हजारांहून अधिक येथे येत भाविक येतात. आलेले भाविक विठ्ठलाचा प्रसाद म्हणून पेढे खरेदी करतात. यामुळे येथील पेढ्यांना चांगली गागणी असल्यामुळे पंढरपुरात पेढे तयार करण्याचे सुमारे ५० ते ६० कारखाने आहेत.
या कारखान्यामध्ये पेढे तयार करण्यासाठी व्यावसायिक गॅसचा वापर करण्यात येतो. मात्र सध्या व्यावसायिक गॅस सिलेंडर देणे बंद करण्यात आले आहे.यामुळे पेढे कारखान्यात पेढे तयार करण्यास अडचण निर्माण होणार आहे.
यामुळे व्यापाऱ्यांवर आर्थिक संकट कोसळणार असून या कारखान्यात काम करणाऱ्या सुमारे १००० कामगारावर उपासमारीची वेळ येणार आहे. म्हणून पेढे तयार करणाऱ्या कारखान्यास शासनाने गॅस पुरवठा करावा, अशी मागणी पेढे उत्पादक व्यापारी किंवा कारखानदारांकडून करण्यात आली आहे.





















