सोलापूर – जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात अनेक वर्षे रिक्त असलेली पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख पदे पदोन्नतीने भरण्यात यावीत अशी मागणी शिक्षक सहकार संघटनेने निवेदनाद्वारे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्याकडे केली आहे.
सोलापूर जिल्ह्य़ातील रिक्त पदासंदर्भात माढा विधानसभा मतदारसंघाचे आ. अभिजित पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली आहे व सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागातील रिक्त केंद्रप्रमुख, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक पदे तातडीने पदोन्नतीने भरण्याबाबत शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे मागणी केली आहे. त्याला शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत उत्तर देताना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
सर्व बाबी लक्षात घेता गावागावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी व तालुका स्तरावरील शिक्षण विभागातील प्रशासन सुरळीत चालण्यासाठी विभागातील रिक्त असलेली पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख पदे अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजना पुर्वी पदोन्नतीने तात्काळ भरण्यात यावीत अशी मागणी शिक्षक सहकार संघटनेचे राज्य सरचिटणीस निलेश देशमुख यांनी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अनिल कुलकर्णी उपस्थित होते.



























