वेळापूर – पोलीस स्टेशन येथे दिनांक १८ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ व शांतता समितीची संयुक्त बैठक उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. आगामी दिनांक २१ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या रमजान ईद तसेच गुढीपाडवा, राम नवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर बैठकीत सण-उत्सव शांततेत व सलोख्याने पार पडावेत यासाठी पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण कार्यालयाकडून प्राप्त सूचनांची माहिती वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आशिष कांबळे यांनी उपस्थितांना दिली. कोणताही जातीय किंवा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्वांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी अनधिकृतपणे लावण्यात आलेले मशिदीवरील स्पीकर व भोंगे काढण्याबाबतही स्पष्ट सूचना देण्यात आल्या. तसेच सण-उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रभारी अधिकारी आशिष कांबळे म्हणाले, “वेळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोणत्याही जयंती उत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये डीजे किंवा डॉल्बी लावण्यास परवानगी दिली जाणार नाही. सर्वांनी शासनाच्या नियमांचे पालन करून शांततेत आणि साधेपणाने उत्सव साजरे करावेत.”
या बैठकीला विविध जयंती उत्सव मंडळांचे पदाधिकारी, मान्यवर तसेच पोलीस पाटील असे सुमारे ५० ते ६० नागरिक उपस्थित होते. यावेळी गोपनीय पोलिस अंमलदार नितीन लिंगडे हेही उपस्थित होते.


























