वेळापूर – येथे मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने पवित्र रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने सकाळी वेळापूर येथील ईदगाह मैदानावर सर्व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र येऊन सामूहिक नमाज पठण केले.
या प्रसंगी माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांचे सुपुत्र व युवा नेते जीवन जानकर यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच वेळापूर सुन्नी जमात संघटनेचे शहराध्यक्ष खुदबुद्दीन कोरबू यांच्या हस्ते जीवन जानकर, रिपाई (आठवले) माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे, वेळापूरचे सरपंच रजनीश बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत वायदंडे, रणजीत सरवदे, स्वप्निल सरवदे यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला मुस्लिम सुंनी जमात संघटनेचे सचिव जावेद मुलाणी यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सरपंच रजनीश बनसोडे यांनी आपल्या भाषणात रमजान ईदच्या शुभेच्छा देताना सांगितले की, “रमजान ईद हा केवळ सण नसून प्रेम, बंधुत्व, त्याग आणि मानवतेचा संदेश देणारा पवित्र दिवस आहे. या सणामुळे समाजात एकोपा, शांतता आणि परस्पर आदर वाढीस लागतो. हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणारा हा सण आपल्याला एकत्र आणणारा आहे.”






















