पंढरपूर – येथील श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी शिर्डी आणि तुळजापुर प्रमाणेच पंढरपुरकरांना स्वतंत्र दर्शन रांगेची व्यवस्था करा अन्यथा मोठे जनआंदोलन उभे करू, असा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिला.
गुढी पाडव्याच्या निमित्ताने अनेक भाविक, वारकरी व पंढरपुरकरांनीही श्रीविठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती, यावेळी एकीकडे व्हीआयपी दर्शन रांगेतुन काहीजणांना सोडले जात होते. तर दुसरीकडं अनेक भाविक व स्थानिक पंढरपूरकर दर्शनासाठी तिष्ठत उभे होते.
ही बाब अत्यंत निंदनीय तसेच खेदाची आहे. त्यामुळे शिर्डी व तुळजापुरला ज्या पध्दतीने स्थानिक नागरिकांसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था आहे तशीच स्थानिक पंढरपुरकरांसाठी स्वतंत्र दर्शन रांगेची दर्शन व्यवस्था मंदिर समितीने देखील सुरू करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या संदर्भात मंदिर समितीला निवेदन देखील दिल्याची माहिती श्री. अँकुशराव यांनी दिली.
——————
जाणुन बुजुन येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती ही स्थानिक पंढरपुरकरांचा अपमान करत असते, त्यामुळे तातडीने यावर उपाययोजना करावी अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू करू
गणेश अंकुशराव ( सामाजिक कार्यकर्ते,पंढरपूर )























