सोलापूर – बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर बार असोसिएशनतर्फे उमेदवारांना आपले विचार, भूमिका आणि भावी धोरणे मांडण्यासाठी विशेष मनोगत व संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येत्या दि. 24 मार्च 2026 रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम सोलापूर बार असोसिएशन हॉल येथे दि. 20/03/2026 रोजी दुपारी 2:00 वाजता अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी सोलापूर बार असोसिएशनचे सभासद असलेले उमेदवार बारचे माजी उपाध्यक्ष अॅड. असीम बांगी, बारचे माजी अध्यक्ष अॅड. संतोष न्हावकर, विद्यमान जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंग रजपूत, माजी जिल्हा सरकारी वकील अॅड. हेमा शिंदे तसेच बार कौन्सिलचे विद्यमान सदस्य अॅड. मिलिंद थोबडे यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व मान्यवर उमेदवारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात बारचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब जाधव यांच्या प्रास्ताविक भाषणाने झाली. त्यांनी आपल्या भाषणात बार कौन्सिलच्या निवडणुकीचे महत्त्व अधोरेखित करत, सर्व वकील बांधवांनी सजगपणे, विचारपूर्वक व जबाबदारीने मतदान करून सक्षम नेतृत्वाची निवड करावी, असे त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बारचे सचिव अॅड. बसवराज हिंगमिरे यांनी अत्यंत नेटक्या पद्धतीने केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार बारचे उपाध्यक्ष अॅड. रियाज शेख यांनी मानले.




















