सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकासंदर्भातील विभागनिहाय आढावा बैठक छत्रपती राजर्षी शाहू महाराज जिमखाना येथे दि. २३ ते २९ मार्च २०२६ या कालावधीत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे.दरम्यान, आज सोमवारी पहिल्या दिवशी कर आकारणी, कर संकलन आणि भूमी व मालमत्ता विभाग या दोन विभागांचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीस महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, शहर अध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर , उपायुक्त आशिष लोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नगरसेवक, नगरसेविका व संबंधित विभागांचे अधिकारी यांच्या माध्यमातून अंदाजपत्रकाचा विभागनिहाय आढावा घेण्यात येत आहे. बैठकीदरम्यान विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेऊन प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महापौर विनायक कोंड्याल यांनी दिले आहेत.
विविध विभागांसाठी निश्चित करण्यात आलेले
वेळापत्रक असे सोमवार दि. २३ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते १२ वाजता कर आकारणी व कर संकलन विभाग तसेच भूमी व मालमत्ता विभाग – दुपारी २ ते ६ वाजता चर्चा करण्यात आली आहे. त्यानंतर दि. २४ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते १ वाजता मंडई व कोंडवाडा विभाग तसेच आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन विभाग दुपारी २ ते ६) यांचा आढावा घेतला जाणार आहे.
दि. २५ मार्च २०२६ रोजी नगर अभियंता तथा संचालक नगर रचना (बांधकाम परवाना विभाग) तसेच विद्युत विभाग – सकाळी १० ते १२, सामान्य प्रशासन विभाग – दुपारी २ ते ४ वाजता , उद्यान विभाग – दुपारी ४ ते ६ वाजता यांच्यावर चर्चा होणार आहे. दि. २६ मार्च २०२६ रोजी सार्वजनिक आरोग्य अभियंता विभाग – सकाळी १० ते २ तसेच झोन क्र. १ ते ८ – दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत यावर चर्चा करण्यात येणार आहे. दि. २७ मार्च २०२६ रोजी परिवहन विभाग – सकाळी १० ते २ वाजता तसेच मनपा प्राथमिक शिक्षण मंडळ – दुपारी २ ते ६ वाजता यांचा आढावा घेतला जाणार आहे. दि. २८ मार्च २०२६ रोजी महिला व बाल कल्याण, मुख्यलेखापरीक्षक, नगरसचिव, पशुवैद्यकीय व दिव्यांग कल्याण विभाग – सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजता यांच्यावर चर्चा होणार आहे.
शहर विकासासाठी अंदाजपत्रक
अत्यंत महत्त्वाचे : महापौर कोंड्याल
यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सोलापूर शहराच्या विकासासाठी हे अंदाजपत्रक अत्यंत महत्त्वाचे असून प्रत्येक विभागाने जबाबदारीने व पारदर्शकतेने काम करणे गरजेचे आहे. नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने निधीचा वापर करून विकासकामांना गती देण्यात येईल.नागरिकाभिमुख धोरणे राबवून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करण्याचा विश्वास महापौर विनायक कोंड्याल यांनी व्यक्त केला आहे.
महापालिकेची सोमवारी अंदाजपत्रकीय सभा
सोलापूर महापालिकेची अंदाजपत्रकीय सभा सोमवार दि. 30 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजता कौन्सिल हॉल सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सभेत स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते या अंदाजपत्रक सादर करणार आहेत.

















