देगलूर : नांदेड जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या नांदेड बॅडमिंटन लीग सिझन-१ मध्ये देगलूरच्या मोरया स्मॅशर्स संघाने दमदार खेळ करत उपविजेतेपद पटकावले. या स्पर्धेत नांदेडच्या शिवा स्ट्रायकर्स संघाने अंतिम सामना जिंकत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
दि. 21 व 22 मार्च 2026 रोजी नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी इनडोअर हॉल येथे ही लीग मोठ्या उत्साहात पार पडली. एकूण आठ संघांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत सुरुवातीचे सामने लीग पद्धतीने खेळविण्यात आले. त्यातून अव्वल चार संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. यामध्ये मोरया स्मॅशर्स, शिवा स्ट्रायकर्स, सिंग वॉरियर्स आणि चक दे स्मॅशर्स या संघांचा समावेश होता.
उपांत्य फेरीतील चुरशीच्या लढतीनंतर मोरया स्मॅशर्स आणि शिवा स्ट्रायकर्स यांनी अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात शिवा स्ट्रायकर्स संघाने बाजी मारत विजेतेपद मिळवले, तर मोरया स्मॅशर्स संघाने उपविजेतेपदावर समाधान मानले. उपविजेत्या मोरया स्मॅशर्स संघाला 11,000 रुपयांचे रोख पारितोषिक व चषक देण्यात आला, तर विजेत्या शिवा स्ट्रायकर्स संघाला 21,000 रुपये व चषक प्रदान करण्यात आला.
मोरया स्मॅशर्स संघाचे मालक मनोज स्वामी व बसवराज पटणे होते. संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट समन्वय आणि कौशल्य दाखवत स्पर्धेत आपली छाप पाडली. संघात विवेकानंद तिडके, प्रा. संतोष वानोळे, डॉ. वाकोडे, डॉ. शहाजी बोडके, अजय पाटील, नितीन कोकाटे, श्यामसुंदर चिंतलवार, ऋतूज कुलकर्णी, स्वराज सोनवणे आणि मारुती भोसले यांचा समावेश होता.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सुमितसिंग पेशकर, संग्राम कदम, रमणा आणा, संतोष भवनगिरकर, चेतन माने, ईश्वरसिंग टेलर, रतनसिंग दुकानदार, बालाजी मेखाले, अभिषेक कदम, संजय जाधव, मुकुल पराटे व तैनात बेग यांनी विशेष परिश्रम घेतले.
नांदेडमध्ये प्रथमच झालेल्या या बॅडमिंटन लीगमुळे जिल्ह्यातील खेळाडूंना नवी संधी मिळाली असून, देगलूरच्या मोरया स्मॅशर्स संघाच्या यशामुळे स्थानिक क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.





















