सोलापूर – शहरामध्ये अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमित, सोलापूर हे मल्टी सुपर स्पेशालिटी रुग्णालय म्हणून 44 वर्षांपासून कार्यरत आहे. अश्विनी सहकारी रुग्णालयामध्ये एकाच छताखाली सर्व प्रकारच्या अत्याधुनिक वैद्यकीय सोयी-सुविधा रुग्णांना पुरविल्या जातात.
सोलापूरातील एका दांपत्यास बऱ्याच वर्षांपासून गर्भधारणा होत नसल्याने अश्विनी सहकारी रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागातील वंध्यत्व निवारण तज्ञ डॉक्टर अर्चना शहा यांच्याकडे उपचार सुरू होते. उपचारानंतर मातेस गर्भधारणा झाली पण गर्भ 25 आठवड्याचा असतानाच मातेला प्रसूती कळा सुरू झाल्या व अत्यंत अकाली प्रसूती झाली (extreme prematurity). सदर डिलीव्हरी स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.सुमन सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अर्चना शहा, डॉ. बकुळ जहागिरदार व डॉ. सुर्यप्रकाश कारंडे यांनी केली. त्यावेळी नवजात शिशुचे वजन फक्त 720 ग्रॅम होते आणि अत्यंत गंभीर व अत्यवस्थ स्थितीत एनआयसीयु विभागामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या नवजात शिशुचे फुफ्फुस हे अत्यंत नाजूक होते.
या शिशुस जवळपास दोन महिने कृत्रिम श्वसनप्रणालीवर (व्हेंटीलेटरवर) ठेवावे लागले. ऑक्सिजनही महिनाभर चालू होते. या नवजात शिशुस ब्रॉन्कोपल्मनरी डिस्प्लेसिया, गंभीर ROP, दूध पचवण्याची अडचण आणि नवजात जंतूसंसर्ग अशा अनेक आजारांचा सामना करावा लागला. हे नवजात शिशु 100 दिवसांच्या एनआयसीयु मधील उपचारानंतर सुखरुप व अत्यंत चांगल्या आरोग्यदायी अवस्थेत घरी परतले. या नवजात शिशुच्या आई-वडीलांनी रुग्णालयाच्या उपचाराबद्दल समाधान व्यक्त करुन, डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या नवजात शिशुच्या आई-वडीलांची डॉक्टरांवरील अढळ श्रध्दा, कन्सलटंट डॉक्टर्स, एनआयसीयु टीमचे अथक परिश्रम आणि सातत्यपूर्ण देखरेख यामुळेच या नवजात शिशु वरील उपचार यशस्वी ठरले, असे नवजात शिशुरोगतज्ञ डॉ. आशुतोष यजुर्वेदी, अश्विनी सहकारी रुग्णालय यांनी सांगितले. या रुग्णाच्या उपचारासंदर्भांत एनआयसीयु विभागप्रमुख डॉ.अतुल कुलकर्णी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. सर्व एनआयसीयु स्टाफ यांनी या रुग्णाची विशेष काळजी घेतली. रुग्णालयाचे एनआयसीयु विभाग हे अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे व मशिनरीने सुसज्ज आहे.
अश्विनी सहकारी रुग्णालयाचे मा.चेअरमन श्री.बिपीनभाई पटेल, मा.व्हा.चेअरमन डॉ.विजय पाटील व संचालक मंडळ यांच्या नेतृत्वाखाली सर्व डॉक्टर्स व कर्मचारीवर्ग हे सर्व रुग्णांवर अत्यंत चांगले उपचार करीत आहेत. याबाबत सर्व स्तरातून अश्विनी सहकारी रुग्णालयाचे अभिनंदन करण्यात येत आहे. अश्विनी सहकारी रुग्णालयामध्ये सोलापूर, महाराष्ट्र, तेलंगाणा व कर्नाटकाच्या उत्तर भागातील अत्यवस्थ व गंभीर रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी दाखल होतात. सोलापूर शहरामध्ये अश्विनी सहकारी रुग्णालय हे गंभीर व अत्यवस्थ रुग्णांकरिता मोठे वरदानच ठरले आहे.





















