सोलापूर – साखर पेठ येथील बाहुसार शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हिंगुलांबिका प्राथमिक शाळेमध्ये वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. याप्रसंगी प्रस्तावनेत शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रमोद हंचाटे यांनी विद्यार्थ्यांनी वर्षभरातील जिल्हास्तर व राज्यस्तरावर जे यश केले आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक केले. व सर्व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शाळेमध्ये या शैक्षणिक वर्षात वर्षभरात विविध कार्यक्रम, उपक्रम, स्पर्धा घेण्यात आले होते. त्या विविध स्पर्धांमध्ये हिंगुलांबिका प्राथमिक शाळेतील २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यश मिळविले. त्या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व आकर्षक बक्षिसे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास बक्षीस पात्र विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमांमध्ये मुंबई येथे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे व जिल्हास्तरीय समूहनृत्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्याचे विशेष सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमास सोलापूरचे उत्कृष्ट नाटककार व दिग्दर्शक म्हणून ओळख असलेले श्री अमोल राजमाने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती विद्यानिकेतन हायस्कूलचे माजी शिक्षक श्री सूर्यकांत कोळी, रमा जगदीश बहुउद्देशीय महिला उत्कर्ष संस्थेचे श्री शरद नाईक, श्रीमंतयोगी प्रतिष्ठानचे श्री महेश कासट, बाहुसार शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री बापू ढगे, सचिव श्री विजय पुकाळे, विद्यानिकेतन प्रशालेचे माजी लिपिक श्री सतीश हंचाटे यांचीही उपस्थिती होती.





















