सोलापूर – शिक्षण विभागातील दफ्तर दिरंगाई आणि प्रलंबित कामांच्या निषेधार्थ शिक्षक भारती संघटनेच्यावतीन माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे आंदोलनावेळी अनुपस्थित असल्याने संतप्त पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलन केले. यामुळे कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, यापूर्वी दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सोलापूर यांच्या कार्यालयात शिक्षक भारतीच्या प्रलंबित मागण्यांवर सहविचार बैठक झाली होती. त्या बैठकीत १५ दिवसांत सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, एक महिना उलटूनही अनेक विषय प्रलंबितच राहिल्याने शिक्षक भारतीने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. माध्यमिक उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे यांनी शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याशी संपर्क साधून संघटनेची प्रलंबित कामे उद्या दुपारपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर संघटनेने आजचे आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे, जिल्हा प्रवक्ते विजयकुमार गुंड, उच्च माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष शाहू बाबर, आश्रम शाळा विभागाचे जिल्हाध्यक्ष विकास धसाडे, जिल्हा सचिव सुरेश कणमुसे, उपाध्यक्ष रियाज अहमद अत्तार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.























