सांगोला – शिवणे (ता.सांगोला) येथे शेतीपंप व घरगुती वीज परवठा वारंवार खंडीत होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी सांगोला महावितरण कार्यालयास निवेदन देऊन येथील वीजपुरवठा पुरेशा दाबाने व सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असल्याने पिकांना आणि जनावरांना वेळेवर पाणी देणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी विजेची गरज आहे. अशा काळात वीज नेहमीच गायब होत असल्याने या परिसरातील नागरिकांचे पशुपालकांचे आणि विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शिवणे येथील शेतकऱ्यांना आणि घरगुती ग्राहकांना भारनियमन व्यतिरिक्त पूर्ण दाबाने व सलग विज कोरडा न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. हे निवेदन उपअभियंता रमेश पोवार यांना देतेवेळी गोरख घाडगे, बाळासाहेब वाळके, दादासाहेब घाडगे, विक्रम घाडगे, अनिल इरकर, प्रताप पाटील, निसार काझी, किरण वाघमोडे, औदुंबर काळे उपस्थित होते.
वीज पुरवठा सुरू असतानाही तो वारंवार खंडित होतो आहे. यामुळे शेतकरी, विद्यार्थी यांचे प्रचंड नुकसान होत असून महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवणे येथील घरगुती विज बिल वसुली शंभर टक्के असतानाही गाव अश्मयुगाचा अनुभव घेत आहे.
-प्रताप पाटील, शिवणे





















