बिलोली – येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डॉ.मोहसीन खान मुजीबपाशा यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे दिला जाणारा ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार केंद्रिय सामाजिक न्यायमंञी ना,खा. रामदास आठवले यांच्या हस्ते गुरुवार, दि.२६ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह,नरिमन पॉईंट येथे आयोजित समारंभात प्रदान करण्यात आला.
सन २०२१-२०२२ या वर्षासाठीचा हा पुरस्कार असून, डॉ.मोहसीन खान यांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या यशामुळे बिलोली तालुक्याच्या सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
डॉ.खान हे गेल्या अनेक वर्षांपासून व्यसनमुक्ती, पर्यावरण, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच पत्रकारितेच्या माध्यमातून व्यसनाधीनता निर्मूलनासाठी त्यांनी सातत्याने लेखन करून जनजागृती केली आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून विधानसभा अध्यक्ष अॕड. राहुल नार्वेकर, सामाजिक न्याय मंत्री ना.संजय शिरसाट, आ.तुषार राठोड, माजी गृहमंत्री सिध्दराम म्हेञे, उपसचिव रविंद्र गोरवे तसेच समाजकल्याण विभागाचे सर्व अधिकारी, मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डाॕ.हर्षदीप कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन हर्षल पाटील व धनश्री प्रधान यांनी केले, तर आभार समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांनी मानले.डॉ. मोहसीन खान यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल आमदार हेमंत पाटील, आ. बालाजी कल्याणकर, आ.विक्रम काळे, आ.सतीश चव्हाण, आ.आनंदराव बोंढारकर तसेच जिल्हा समाजकल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, प्रभारी समाजकल्याण निरिक्षक राजेश सोनटक्के, विविध वर्तमानपत्रांचे संपादक, पत्रकार, हितचिंतक व मित्रपरिवार यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.




















