सोलापूर : महापालिकेच्या सोमवारी झालेल्या अंदाजपत्रकीय सभेत वातावरण अचानक तापले. जेव्हा शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे गटनेते अमोल शिंदे आणि भाजपचे नगरसेवक प्रशांत पल्ली यांच्यात जोरदार वादावादी झाली. सभागृहात काही काळ अक्षरशः तणाव आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. हमरी तुमरी ,एकेरी भाषेमुळे तणाव शिगेला गेला.
अंदाजपत्रकावरील सूचना व उपसूचनांवर सर्वपक्षीय सदस्यांचे भाष्य सुरू असताना अमोल शिंदे यांनी परिवहन उपक्रमातील ‘चेसी क्रॅक’ बसेस प्रकरणावर भाष्य करत महापालिकेला बसलेल्या तब्बल 57 कोटींच्या दंडाचा मुद्दा उपस्थित केला. याच वेळी प्रशांत पल्ली यांनी अचानक ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’ घेत हस्तक्षेप केला आणि यावरूनच ठिणगी पडली.आपले भाषण तोडल्यामुळे संतप्त झालेल्या अमोल शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट पल्ली यांच्यावर एकेरी भाषेत हल्लाबोल केला. “मी बोलत असताना मध्येच का येतोस? मला थांबवणारा तू कोण?” अशा कडक शब्दांत त्यांनी पल्ली यांना सुनावले. यामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली. पल्ली यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला, मात्र शिंदे अधिकच आक्रमक झाले.
वाद चिघळत असतानाच सभागृह नेते नरेंद्र काळे, रोहिणी तळवळकर, अनंत जाधव यांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी उघडपणे अमोल शिंदे यांची बाजू घेतल्याने राजकीय रंग अधिकच गडद झाला.
अखेर महापौर विनायक कोंड्याल यांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजूंना शांत राहण्याचे आदेश दिले आणि काही वेळातच तणाव निवळला.
वातावरण शांत झाल्यानंतर अमोल शिंदे पुन्हा उभे राहत 57 कोटींचा दंड महापालिकेला परवडणारा आहे का, असा थेट सवाल उपस्थित केला.यावर आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या कार्यवाहीचे स्पष्टीकरण दिले. मात्र शिंदे यांनी समाधान न मानता या गंभीर विषयावर महापौरांनी स्वतंत्र विशेष बैठक घ्यावी, अशी ठाम मागणी लावून धरली. महापौर कोंड्याल यांनीही ही मागणी मान्य करत लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

















