माहूर – साडेतीन शक्तीपीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडाच्या सर्वांगीण विकासासाठी आराखडा तयार करण्यात आला असून, काही तांत्रिक अडचणी असल्या तरी पुढील चार वर्षांत माहूर गडाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार, असा विश्वास आमदार भीमराव केराम यांनी व्यक्त केला.
तालुका क्रीडा संकुलाच्या उभारणीच्या कामाचा शुभारंभ गुरुवारी (दि. २ एप्रिल) पांडव लेणी परिसरातील शासकीय आदिवासी आश्रम शाळेजवळ उत्साहात पार पडला. आमदार केराम यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप साईनाथ महाराज वसमतकर होते.
यावेळी नगराध्यक्ष फिरोज दोसानी, तहसीलदार अभिजित जगताप, गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, उपनगराध्यक्ष नाना लाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता भिसे, गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार, बाबू केंद्रे, माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, नगरसेवक गोपू महामुने यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
विकासकामांमध्ये कोणताही पक्षपात न करता सर्व भागांचा समतोल विकास करण्यावर भर दिला असल्याचे आमदार केराम यांनी नमूद केले. शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून विविध योजनांतून निधी आणण्यात येत असून, प्रलंबित कामांना गती देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी मांडलेल्या मटण मार्केट, वाढीव पाणीपुरवठा योजना तसेच क्रीडा संकुलाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी आवश्यक निधी मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुढील काळातही विकासकामांमध्ये राजकारण न करता सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका कायम राहील, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेभरे यांनी केले. तालुका क्रीडा अधिकारी बालाजी शिर्शीकर यांनी आभार मानले, तर सूत्रसंचालन एस. एस. पाटील यांनी केले.
यावेळी माजी सभापती संजय राठोड, हाजी उस्मानखान चांदखान, अनिल वाघमारे, प्रा. राजेंद्र केशवे यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

















