नांदेड – भारताच्या ऐतिहासिक ‘जनगणना २०२७’ प्रक्रियेला १ एप्रिल २०२६ पासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. या मोहिमेत आपल्या जिल्ह्याचा सहभाग महत्त्वपूर्ण असून जनगणना हे केवळ माहितीचे संकलन नसून तो आपल्या जिल्हा, राज्य व राष्ट्राच्या सर्वांगीण विकास प्रक्रियेचा पाया आहे. शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांचे नियोजन याच माहितीवर आधारित असते. त्यामुळे, प्रत्येक नागरीकाने आपली अचूक माहिती प्रगणकांना उपलब्ध करुन द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
जनगणनेचा पहिला टप्पा: गृहसूची आणि घरगणना (एप्रिल ते सप्टेंबर २०२६) सध्या जनगणनेचा पहिला टप्पा सुरू झाला असून, यामध्ये प्रगणक (Enumerators) आपल्या घरी येऊन घराचे स्वरूप, उपलब्ध सुविधा आणि कुटुंबातील सदस्यांची प्राथमिक माहिती घेणार आहेत. पहिल्या टप्प्यात एकूण ३३ प्रश्नांची उत्तरे नागरिकांना द्यायची आहेत.
१. अचूक माहिती द्या: आपल्या कुटुंबाची माहिती देताना ती पूर्णपणे सत्य आणि अचूक द्यावी. यामध्ये चुकीची माहिती दिल्यास नियोजनात अडचणी येऊ शकतात.
२. प्रगणकांना सहकार्य करा: आपल्या घरी येणाऱ्या शासकीय कर्मचारी किंवा प्रगणकांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे.
३. जातीनिहाय गणना: केंद्र सरकारच्या निर्णयानुसार यंदा सर्व समुदायांची जातीनिहाय माहिती देखील संकलित केली जाणार आहे.
४. माहितीची गोपनीयता: नागरिकांनी दिलेली वैयक्तिक माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. या माहितीचा वापर केवळ सांख्यिकी हेतूसाठी केला जाणार असून ती कोणाशीही सामायिक केली जाणार नाही. डिजिटल पर्यायाचा वापर:जे नागरिक स्वतःहून माहिती भरण्यास उत्सुक आहेत, त्यांच्यासाठी खास मोबाईल ॲप आणि वेब पोर्टलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
‘सेल्फ इन्युमरेशन’ (Self-Enumeration) पर्यायाचा वापर करून नागरिक आपली माहिती स्वतः नोंदवू शकतात.या संदर्भात दि.०२ एप्रिल रोजी बि.प्रसाद सहसंचालक जनगणना कार्यालय मूंबई,नेहाल धूरंधरे काॅर्डिनेटर नांदेड जिल्हा यांनी भोकर अर्धापूर हदगाव मूदखेड येथील जनगणनेचा आढावा घेतला.
















