नातेपुते – नातेपुते जवळील पुलाजवळ इर्टिगा कार निरा उजव्या कालव्यात कोसळून पत्नी,सासू, सासरे अशा तिघांचा मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी झाला असून अद्याप पत्नीचा मृतदेह मिळाला नाही. ही घटना शुक्रवारी पहाटे ४:३० च्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,
सुनील टेळेकर (वय ३६ वर्षे) रा. फोंडशिरस ता. माळशिरस, रामनवमी यात्रेनिमित्त आपल्या फोंडशिरस गावी आले होते. त्यांचा मुलगा दक्ष सुट्टी असल्याने मामाकडे राहिला होता. त्याचे डोळ्याचे ऑपरेशन करायचे असल्याने त्याला मुंबईला घेऊन जाण्यासाठी हे कुटुंब शुक्रवारी पहाटे मुंबईहून(एमएच ४३ सीसी ०१५८)इर्टिगा गाडीने फोंडशिरस कडे निघाले होते.नातेपुते जवळील पुलाजवळ पोहोचताना पहाटेच्या वेळी डुलकी लागल्याने चालकाचा कार वरील ताबा सुटून कार थेट निरा उजव्या कालव्यात कोसळली.
या अपघातात सासरे हनुमंत जठार (वय ५५ वर्षे ), सासू मंजूळा जठार (वय ४९,वर्षे ) व सुनील यांची पत्नी प्रीती सुनील टेळेकर (वय ३०,वर्षे) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हनुमंत व मंजूळा जठार यांचे मृतदेह नागरिक व प्रशासनाने कालव्यातून बाहेर काढले.परंतु प्रीती टेळेकर यांचा मृतदेह अद्याप सापडला नसून, पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची शक्यता आहे. याबाबत शोधकार्य सुरू आहे.
सुनील टेळेकर सुदैवाने वाचले असून त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व नातेपुते पोलीस स्टेशनने तात्काळ मदतकार्य सुरू केले. या घटने संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास नातेपुते पोलीस स्टेशनचे स पो नि विशाल वायकर करीत आहेत.
















