टेंभुर्णी – भारतीय जनता पक्षाच्या वतीने माढा पश्चिम मंडलातील पदाधिकाऱ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय निवासी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ४ व ५ तारखेला टेंभुर्णी येथे हा दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडणार आहे.
महाराष्ट्रभर सुरू असलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय निवासी प्रशिक्षण अभियानाचा हा एक महत्त्वाचा भाग असून, पक्ष संघटन अधिक सक्षम व सशक्त करण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचे विशेष महत्त्व असल्याचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे यांनी सांगितले.
या प्रशिक्षण शिबिरात संघटन मंत्री मकरंदजी देशपांडे, सहसंघटन मंत्री योगेशजी बाचल, सोलापूर पूर्व जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, माढा भाजपा नेते रणजितसिंह भैय्या शिंदे यांच्यासह सरचिटणीस व संयोजक सचिन शिंदे, गणेश चिवटे, सहसंयोजक दत्तात्रेय जाधव तसेच प्रदेश व जिल्हास्तरीय मान्यवर वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.
या प्रशिक्षण वर्गात प्रदेश, जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख, नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच नगरसेवक सहभागी होणार आहेत. पक्षाची कार्यपद्धती, ध्येय-धोरणे, उद्दिष्टे, विचारधारा, संघटन बळकटीकरण आणि पक्ष शिस्त या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.
या निवासी प्रशिक्षण शिबिरामुळे कार्यकर्त्यांना पक्षाची भूमिका अधिक स्पष्ट होऊन संघटनात्मक कामात गती येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सर्व संबंधित पदाधिकाऱ्यांनी या प्रशिक्षण शिबिरात उपस्थित राहून यशस्वी करावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष योगेश बोबडे यांनी केले आहे.

















