मांडवी – आदिवासी पेसा शिरपूर शिवारात निर्माण होणाऱ्या स्टोन क्रेशर प्रकल्पाला आजूबाजूच्या आदिवासी शेतकऱ्यांचा विरोध आहे. या स्टोन क्रेशर ला वीज पुरवठा करण्यासाठी नियमबाह्य पद्धतीने आदिवासीच्या शेतात विजेचे बारा खंबे रातोरात उभे केले.यासाठी आदिवासी शेतकऱ्यांची साधी परवानगी किंवा संमती सुद्धा घेण्यात आली नाही. बेकायदेशीर काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल झाले याविषयीं आज मांडवीचे सरपंच सुमनबाई पेंदोर व माजी सरपंच कमलबाई पेंदोर यांच्या शिष्टमंडळाने आज आ.भीमरावजी केराम यांची भेट घेऊन सर्व वृत्तांत सांगितले त्यामुळे क्रेशर चे प्रकरण आ. केराम यांच्या कोर्टात आले. आदिवासी हा जल, जंगल,जमीन चा मालक असून त्याच्या किंवा त्याच्या मालमत्तेवर कुणी जबरदस्ती अन्याय करीत असेल तर ते होऊ देणार नाही अशी स्पष्ट भूमिका आ.भीमरावजी केराम यांनी मांडली व या बाबत उप विभागीय अधीकारी, तहसीलदार, वीज वितरणसह संबंधित अधिकाऱ्यांशी बोलूत असे आश्वासन दिले.
शिष्टमंडळात सरपंच सुमनबाई पेंदोर, माजी सरपंच कमल बाई पेंदोर, ग्रा.प. सदस्य रेणुका राजू कुडमिते, कौसल्याबाई रमेश मेश्राम, विमलबाई तुकाराम मेश्राम, विनोद मेश्राम, संजय मडावी, प्रतीक मेश्राम, कोसबा मेश्राम इत्यादी आदिवासी बांधव उपस्थित होते.
स्टोन क्रेशरच्या रोज उडणाऱ्या प्रचंड धुळीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी नापिकी होतील पिके नष्ट होतील. वायू व ध्वनी प्रदूषण वाढून पर्यावरणाचा व शेतकऱ्यांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होईल. ब्लास्टिंग मुळे लिंगी तांड्यातील घरांना तडे जाणार त्यामुळे हा प्लांट अन्यत्र हलवावे एवढीच आमची मागणी आहे अन्यथा जिल्हाधिकारी नांदेड यांच्या कार्यालयापुढे कुटुंबासह आमरण उपोषण करण्यात येईल असा निर्णय मांडवीच्या आदिवासी बांधवांनी घेतला.

















