माढा : अंजनगाव खे येथे १ एप्रिल रोजी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्यानंतर अंजनगाव खे येथील दोन गटात वादाला सुरुवात होऊन गेल्या चार दिवस गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एक गट पुतळा बसवला आहे त्याच ठिकाणी ठेवण्यास आग्रही होता तर दुसरा गट पुतळा त्या ठिकाणाहून हटवण्यासाठी आग्रही होता या वादातून दोन्हीकडून आंदोलनाला सुरवात झाली होती. या आंदोलनाला गेली तीन दिवस काहीस हिंसक वळण लागले होते त्यातून गावात व परिसरात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले. या सर्व घडामोडीवर नियंत्रण आणण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या वतीने अविरतपणे प्रयत्न करण्यात येत होते. त्या प्रयत्नाला शनिवारी यश आले आणि सामंजस्य पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणाहून स्थलांतरित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
पालकमंत्री जयकुमार गोरे माजी आमदार राजन पाटील आमदार अभिजीत पाटील जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या शिष्टाईला व गावातील दोन्ही गटाने दाखवलेली समंजस्याची भूमिका हा वाद मिटण्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरली आहे. शिवरायांच्या पुतळा सुशोभीकरणासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी १ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे सांगितले.
पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी समन्वय आणि एकोप्याची भूमिका बजावत परिस्थिती सुरळीत करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. तसेच या घटनेत सोलापूर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी अत्यंत संयम आणि समन्वयाची भूमिका घेत, दिलेल्या तोडग्यावर दोन्ही बाजूंच्या नागरिकांनी एकमत दर्शवले अंजनगाव (खे) येथील दोन्ही समाजातील नागरिकांनी दाखवलेला संयम आणि सहकार्य वाद मिटण्यास मोलाचा ठरला आहे.
याप्रक्रियेत पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस उपविभागीय अधिकारी अंजली कृष्णा, पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, पोलीस उपाधीक्षक देवळेकर, प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार संजय भोसले, माढ्याचे पोलीस निरीक्षक राहुल शिंदेंनी, तसेच इतर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी समन्वयाची भूमिका घेत शांतता राखण्याचे प्रयत्न केले.
चौकट….
अंजनगाव (खे) येथील ग्रामस्थ बाबुराव माळी यांच्या हस्ते स्थलांतरीत पुतळ्याचे पूजन….
शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास प्रशासनाच्या वतीने मंदिराच्या जागेतील पुतळा शिवभक्तांना मान्य असलेल्या जागेत स्थलांतरीत करण्याचे काम सुरु झाले. यासाठी महसूल व पोलिस यंत्रणेने गावातील पूर्ण परिसर ताब्यात घेतला होता. यावेळी संपूर्ण इंटरनेट सेवा बंद होती. पुतळा स्थलांतराचे चित्रण करण्यास निर्बंध घातले होते. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारे,पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, पोलिस उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णमूर्ती व तहसीलदार संजय भोसले, गुन्हे शाखेचे संजय जगताप व अंजनगाव खे. येथील ग्रामस्थ माळी व इतरांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
















