सोलापूर : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्ताने निघणाऱ्या मिरवणुकीचे निमंत्रण बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांना देण्यात आले. संविधान भवनसाठी एक कोटी निधी तरतूद केल्याबद्दल महापौर विनायक कोंड्याल यांचा भीमसैनिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने संविधान भवनासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल महापौर विनायक कोंड्याल यांचा सत्कार करण्यात आला. मध्यवर्ती महामंडळाचे विश्वस्त अध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी उत्सव अध्यक्ष नागेश इंगळे, सचिव रॉकी बंगाळे, उपाध्यक्ष मिलिंद प्रक्षाळे, चाचा सोनवणे, अमोल कदम, संतोष घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.
महापौर कोंड्याल यांना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीसंदर्भात विविध उपाययोजना करण्याबाबत निवेदन देण्यात आले. मिरवणूक मार्गावरील स्वच्छता,झाडंच्या फांद्या छाटणी करणे,पाणीपुरवठा, प्रकाशयोजना, वाहतूक व्यवस्थापन तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
संविधान भवनासाठी मंजूर करण्यात आलेला निधी हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन असून, शहरातील नागरिकांसाठी हा एक प्रेरणादायी उपक्रम ठरेल, असे महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले. मिरवणुकीसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा महापालिकेच्या वतीने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.


























