पंढरपूर – पंढरीतील सरकारी मोकळ्या जागांच्या शोधासाठी पंढरपूर तिर्थक्षेत्र बचाव समितीकडून बुधवारी (ता.८) मोटरसायकल रँलीचे आयोजन करण्यात होते. या रँलीस संभाव्य काँरिडोर बाधित नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. या वेळी शहरातील अनेक सरकारी मोकळ्या जागा शासनाच्या निदर्शनास आणून दिल्याची माहिती तिर्थक्षेत्र बचाव समितीचे प्रमुख अभयसिंह कुलर्णी (इचगावकर ) यांनी दिली.
या रँली संदर्भात माहिती देताना कुलकर्णी यांनी सांगितले की, पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीचे वतीने महिन्यापूर्वी कोरिडोर विरोधात भला मोठा मोर्चा निघून जनप्रक्षोभ दिसून आलेला होता. निश्चितपणे त्याचे अपेक्षित प्रतिसाद दिसून आले. त्या मोर्चात, “घरेदारे पाडून विध्वंसक विकास करण्यापेक्षा वर्षानुवर्षे मोकळ्या पडलेल्या सरकारी जागांवर कोरिडोरसारखी विकास कामे कराव्या”अशा प्रमुख मागण्या होत्या.
दरम्यान अनेक जागरूक नागरिक, पत्रकार, जिज्ञासू बाधित यांची त्यावेळेस मागणी होती की, या पडाक सरकारी जागा उजेडात आल्या पाहिजेत. आजवरच्या झालेल्या प्रचंड सरकारी खर्चाची उपयोगिता तपासली पाहिजे. यासाठी पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीचे वतीने., “पंढरीच्या शाश्वत विकासासाठी सरकारी मोकळ्या जागांच्या शोधासाठी खास मोटरसायकल रँली काढण्यात आली.
दरम्यान बुधवारी सकाळी ०९.३० वाजता येथील खादी ग्रामोद्योग, स्टेशन रोड येथून ही भव्य बाईक रँली मार्गस्थ झाली. त्या नंतर ही रँली सावरकर पुतळा, जुने बसस्टॅण्ड, भोसले चौक,जुने कोर्ट,हनुमान मैदान, नगरपालिका दवाखाना, जळका वाडा, कालिकादेवी चौक, सीपीडब्ल्युडी, मध्यप्रदेश भवन पासून सांगोला चौक, इंदिरा गांधी भाजी मंडई, चौफाळा,छत्रपती शिवाजी महाराज चौक, गजानन महाराज पिछाडी,संत गाडगे महाराज चौक, यमाई तलाव खालचे पार्किंग,एमटीडीसी भक्तनिवास,ब्लड बँक,पद्मावती उद्यान पिछाडी मार्गे येथील प्रांत कार्यालया मध्ये येवून त्या ठिकाणी रँलीतील सहभागी नागरिकांकडून आपल्या विविध मागण्यांचे तसेच शहरातील मोकळ्या शासकीय जागा संदर्भातील माहितीचे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले आणि त्या नंतर या बाईक रँलीची सांगता झाल्याचे अभयसिंह कुलकर्णी यांनी सांगितले.

















