सोलापूर : महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने तहसील कार्यालय उत्तर सोलापूर यांच्या वतीने ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियान’ अंतर्गत बाळे येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तर सोलापूरचे तहसीलदार निलेश पाटील होते. यावेळी व्यासपीठावर नायब तहसीलदार सुधाकर बंडगर, गटविकास अधिकारी राजाराम भोंग, माजी नगरसेवक गणेश पुजारी, राजाभाऊ आलोरे, सुनील भोसले, सुनिता कोरे तसेच गुळवंचीचे सरपंच भोसले उपस्थित होते. याशिवाय मंडळ अधिकारी संतोष कांबळे, ग्राम महसूल अधिकारी सिद्धाराम कराळे, नरसिंह कटकधोंड, सुवर्णा देवगन, तुकाराम माने, राहुल तोडकरी आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या शिबिरात नागरिकांसाठी विविध शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला. प्रलंबित फेरफार प्रकरणे, सातबारा उताऱ्यांतील चुका दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीयुक्त उतारे व सातबारा वाटप यासोबतच नॉन-क्रीमिलिअर प्रमाणपत्र, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्रे, सामाजिक अर्थसहाय्य योजना, विद्यार्थ्यांसाठी दाखले आदी सेवा देण्यात आल्या. एकूण सुमारे २२ विविध शासकीय योजनांचे स्टॉल्स या शिबिरात उभारण्यात आले होते.
गुळवंची, खेड, भोगाव आणि बाळे परिसरातील नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध सेवांचा लाभ घेतला. शासनाच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

























