पंढरपूर – विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी भैरवनाथ शुगर्सचे अध्यक्ष अनिल सावंत यांच्यासह शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र पालिकेतील त्यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीतून विजयी झालेल्या बहुतांश नगरसेवकांनी या पक्षप्रवेशास चक्क विरोध दर्शविला आहे.
कारण या नगरसेवकांनी चक्क जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत आपल्या वेगळ्या गटास मान्यता द्यावी असे सांगत पालिकेत वेगळी चुल मांडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भगिरथ भालकेंची पक्षप्रवेशाच्या अगोदर घरातच गोची झाल्याचे बोलले जात आहे. पंढरपूर, मंगळवेढा शहर आणि तालुक्याच्या विकास कामांसाठी भगीरथ भालके यांनी शिंदे शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
या बाबत पंढरपूर येथे त्यांची आपल्या कार्यकत्यां समवेत बैठक सुरू असतानाच दुसरीकडे त्यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे काही नगरसेवक मात्र जिल्हाधिकारी यांच्या भेटीला सोलापूर येथे दाखल झाले होते. विशेष म्हणजे स्व. भारत भालके यांनी पंढरपूर नगरपरिषद निवडणुकी दरम्यान पंधरा वर्षापूर्वी जी तीर्थक्षेत्र विकास आघाडी स्थापन केली होती, त्या आघाडीशी भालके यांचा संबंध नसल्याचे त्यांनी जाहीर केले व व्हिपचा अधिकार देखील नसल्याचे सांगितले आहे.
तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या बॅनरखाली निवडून आलेले नागेश भोसले, प्रसाद कळसे, संजय बंदपड़े, अक्षय गंगेकर, नगरसेविका प्रणिता घाडगे यांचे पती किरण घाडगे, नगरसेविका साधना धोत्रे यांचे पती सुधीर धोत्रे, नगरसेविका रुक्मिणी धोत्रे यांचे पती धनाजी धोत्रे यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन स्वतंत्र गट असल्याची भूमिका मांडली आहे. यावेळी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष सुधीर धुमाळ देखील उपस्थित होते.
दरम्यान तिर्थक्षत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांच्या या खेळीनंतर विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके आता नेमकी कोणती भूमिका घेतात ? याकडे विठ्ठल परिवाराचे तसेच भालके समर्थकांचे लक्ष लागले आहे.
























