पंढरपूर – पैसा सत्ता यापेक्षा कुटुंब महत्त्वाचे असते त्यामुळेच मी नेहमी सांगते, ‘रिश्ते मायने रखते है’ त्यामुळे संपूर्ण कुटुंब सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
खासदार सुप्रिया सुळे या शुक्रवारी पंढरपूरात विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या होत्या. त्यावेळी मंदिरात विठुरायाच्या दर्शना नंतर माध्यमांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, बारामतीच्या पोटनिवडणुकीत माझा रोल मतदानाला जाण्याचा आहे. शेवटी रिश्तेही मायने रखते है.
सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला जाणार का? या प्रश्नावर उत्तर देताना हा प्रश्न त्यांनी विचारायला हवा असे सांगत अजित पवार गटाकडून बोलावणे आल्यास बारामतीत सुनेत्रा वहिनींचा प्रचार करण्याचे थेट संकेत सुप्रिया सुळे यांनी दिले आहे. तुम्ही हा प्रश्न अजित पवार गटाच्या वतीने विचारत असाल तर त्याचे उत्तर माझ्याकडे तयार असल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले आहे.
बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध का झाली नाही या प्रश्नावर सुळे यांनी याबाबतचे उत्तर तुम्ही अजित पवार गटालाच विचारा कारण यासाठीची सर्व मॅनेजमेंट तेच पाहत होते, असे सांगत बिनविरोध निवडणूक पूर्ण होण्यामागे अजित पवार गटाचे अपयश असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
दरम्यान काल दिवसभर मी बारामतीत नव्हते त्यामुळे नेमके काय घडले याची मला माहिती नाही पण निवडणूक काळात निवडणूक लढविण्यास कार्यकर्ते उत्सुक असतात असे सांगत सुप्रिया सुळे यांनी या प्रश्नाला बगल दिली.
——————-
शेवटी माणसेच लागतात
पैसा सत्ता यापेक्षा कुटुंब महत्त्वाचे असते त्यामुळेच मी नेहमी सांगते, माणसांच्या अतिसुखात आणि अति दुखात माणसेच लागतात. पैसा, सत्ता, राजकारण हे नेहमी होतच राहते. ते कधीही थांबत नाही. ‘रिश्ते मायने रखते है’ त्यामुळे संपूर्ण कुटुंब सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी असल्याचेही खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
























