वैराग – बार्शी तालुक्यातील शेळगाव (आर) येथील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या शेळगाव-वाणेवाडी रस्त्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या सीमेवरील ‘बसवेश्वर चौक’ हा विकासाचा केंद्रबिंदू असूनही, केवळ प्रशासकीय दिरंगाईमुळे हा मार्ग रखडला आहे. याप्रकरणी स्थानिक अल्पभूधारक शेतकरी व समाजसेवक दयानंद भगवान बादगुडे यांनी थेट लोकायुक्त आणि मंत्रालय स्तरावर लढा पुकारला असून, प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास तीव्र संघर्षाचा इशारा दिला आहे.
काय आहे मुख्य अडचण?
शेळगाव (आर) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोरून जुना काटी रस्ता (बसवेश्वर चौक) सीमा हद्द ते वाणेवाडी हा रस्ता जिल्हा व राज्य मार्गाला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. मात्र, तांत्रिक कारणास्तव या मार्गाला अद्याप अधिकृत ‘रस्ता क्रमांक’ मिळालेला नाही. रस्ता अधिकृत रित्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दफ्तरी नसल्याने १० कोटी रुपयांचा प्रस्तावित निधी तांत्रिक कारणास्तव प्रलंबित आहे.
लोकायक्तांच्या आदेशाची पायमल्ली?
दयानंद बादगुडे यांनी ८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई येथे लोकायुक्त कार्यालयात उपस्थित राहून आपली कैफियत मांडली होती. लोकायुक्तांनी या प्रकरणाची दखल घेत प्रशासनाला कडक निर्देश दिले आहेत. असे असूनही, सोलापूर आणि धाराशिव जिल्हा प्रशासन सीमेच्या वादावरून एकमेकांकडे बोट दाखवत वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप बादगुडे यांनी केला आहे.
स्वखर्चातून तांत्रिक पुराव्यांची जुळवाजुळव
एका बाजूला प्रशासन दिरंगाई करत असताना, बादगुडे यांनी स्वतःच्या कुटुंबाच्या पोटाला चिमटा काढून, पदरमोड करत ड्रोन सर्व्हे, गुगल मॅपिंग आणि तांत्रिक नकाशे तयार केले आहेत. त्यांनी ६ मार्च २०२६ रोजी उपविभागीय अभियंता (जि.प. बांधकाम, बार्शी) यांच्याकडे ७ संच (Sets) कागदपत्रे जमा केली आहेत. यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे:
गाव, तालुका नकाशा आणि गुगल मॅप.
ग्रामपंचायत ठराव आणि लोकप्रतिनिधींची शिफारस पत्रे.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे पत्र.
बसवेश्वर चौक: विकासाचा ‘झिरो पॉईंट’
बसवेश्वर चौक हा सोलापूर-धाराशिव आणि बार्शी-तुळजापूर या दोन जिल्ह्यांच्या व तालुक्यांच्या सीमेवर आहे. या चौकाच्या विकासावर संपूर्ण परिसराचे आर्थिक भवितव्य अवलंबून आहे. रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर निर्गमित करताना ‘बसवेश्वर चौक’ (Zero Point) येथूनच कामाला सुरुवात करण्याची कायदेशीर अट असावी, अशी आग्रही मागणी बादगुडे यांनी केली आहे.
आता रस्ते विकासासाठी ते ठाम उभे आहेत. “हा रस्ता येणाऱ्या पिढ्यांच्या प्रगतीचा मार्ग आहे. भ्रष्टाचार आणि स्थानिक राजकारणामुळे यात खोडा घातला जात आहे. जर ३० दिवसांत या रस्त्याला अधिकृत क्रमांक देऊन निधी मंजूर झाला नाही, तर विधी सेवा प्राधिकरण आणि मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार,” असे दयानंद बादगुडे यांनी ठणकावून सांगितले आहे.
”प्रशासकीय साखळी आणि स्वार्थी हितसंबंधांमुळे माझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, याची मला जाणीव आहे. पण वैयक्तिक मृत्यू पेक्षा गावाला विकासापासून वंचित ठेवणे हा मोठा गुन्हा आहे, असे मी मानतो. हा लढा शेवटच्या श्वासापर्यंत सुरू राहील.”
— दयानंद भगवान बादगुडे (अर्जदार, शेळगाव आर)
आता चेंडू प्रशासनाच्या दरबारात असून, जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रालय यावर काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण बार्शी तालुक्याचे लक्ष लागले आहे.

























