सोलापूर: शहरात भीषण उन्हामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, रस्त्यावरून अनवाणी चालणाऱ्या कष्टकऱ्यांचे हाल होत आहेत. रखरखत्या उन्हात अनवाणी चालणाऱ्या कष्टकऱ्यांच्या वेदना ओळखून संभाजी ब्रिगेडच्या वतीने भर उन्हात दुपारी 12 ते 4 या वेळेत शहरातील रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, सिद्धेश्वर मंदिर सात रस्ता परिसरातील भर उन्हात गरजू अनवाणी फिरणाऱ्या नागरिकांना चप्पल वाटप करण्यात आली .
यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावरील कष्टकरी, निराधार कचरा वेचक आणि वयोवृद्ध नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या पायात चप्पल चढवली. “समाजकारण हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे,” या भावनेतून गेल्या चार वर्षापासून अखंडपणे दर उन्हाळ्यात हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
या उपक्रमामध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रमोद पवार यांचे सहकार्य लाभले. यावेळी संभाजी ब्रिगेड मा. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हा अध्यक्ष संभाजी भोसले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनल दास, शेखर भोसले, मनीषा कोळी, सोनाली सगर आदी सहभागी झाले होते.























