बार्शी – येथील संत विसोबा खेचर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रदीप हरिदास यांना सन २०२३-२०२४ या वर्षासाठी उत्कृष्ट आयटीआय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा मुंबई येथील शासकीय तांत्रिक प्रशाला येथे पार पडला.
यावेळी कौशल्य, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते प्रदीप हरिदास यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्यास व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे सतीश सूर्यवंशी, विभागाच्या मुख्य सचिव मनीषा वर्मा तसेच रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य प्रदीप हरिदास हे यापूर्वी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील सद्गुरु वामनराव पै शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्राचार्य म्हणून कार्यरत असताना त्यांनी आदिवासी भागातील युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनविण्याचे उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे विविध स्तरांतून प्राचार्य प्रदीप हरिदास यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.























