सांगोला – भारत-अमेरिका व्यापार करार रद्द करा अशी मागणी निवेदनाद्वारे सांगोला युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली असून सदर निवेदन तहसीलदार बाळूताई भागवत यांना देण्यात आले आहे.
सदर निवेदनात अमेरिकेतील कृषी उत्पादनांना शून्य टक्के आयात शुल्क घेतले जाणार असून त्यामुळे स्वस्त विदेशी माल भारतीय बाजारात या करारा मुळे मोठ्या प्रमाणत येईल. परिणामी , भारतीय शेतकऱ्यांच्या उत्पादनांच्या किंमती कोसळतील व त्यांना योग्य बाजार भाव मिळणार नाही. तसेच भारतामध्ये बहुतांश शेतकरी हे लहान व अल्पभूधारक आहेत, ज्यांच्याकडे पुरेशी सरकारी मदत नाही किंवा आधुनिक साधने नाहीत. त्यांना अमेरिकेतील मोठ्या व अनुदानित शेतकऱ्यांशी स्पर्धा करणे शक्य नाही. हा करार शेतकऱ्यांसाठी असमान स्पर्धा निर्माण करतो. तसेच या करारामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्था व किमान आधारभूत किंमत यांची उपयुक्तता कमी होईल. व्यापारी स्थानिक शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याऐवजी आयात केलेल्या उत्पादनांना प्राधान्य देतील, त्यामुळे स्थानिक बाजारपेठेचे अस्तित्व धोक्यात येईल. दुग्धव्यवसायावरही या कराराचा गंभिर परिणाम होणार आहे. स्वस्त आयातीत दूध किंवा दुग्धजन्यपदार्थामुळे गावपातळीवरील दुग्धउत्पादकांचे उत्पन्न कोसळेल व ग्रामीण अर्थव्यवस्था डगमगेल. या करारामुळे कृषीक्षेत्रावर मोठ्या खाजगी कंपन्यांचे वर्चस्व निर्माण होण्याचा धोका आहे. ज्यामुळे भारतीय शेतकरी याच्यावर स्वतःच्या जमिनीवर मजूर बनण्याची वेळ येऊ शकते. वरील सर्व बाबींचा विचार करता हा करार शेतकरी विरोधी असून देशाच्या आत्मनिर्भरतेस बाधा आणणारा आहे, असे नमूद करण्यात आले आहे. सदर निवेदन देतेवेळी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष अजित चव्हाण, शहर युवक अध्यक्ष फिरोज मणेरी उपस्थित होते.






















