कुर्डुवाडी – येथील आदर्श पब्लिक स्कूलने यंदाच्या CBSE १०वी परीक्षेत शानदार यश मिळवत पुन्हा एकदा गुणवत्तेची परंपरा कायम राखली असून माढा तालुक्यात शिवांशु जाधव – ९८% गुणांसह यशाचा नवा विक्रम प्रस्थापीत करत अव्वल ठरला आहे.
एकूण ३० विद्यार्थ्यांपैकी तब्बल १३ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा अधिक गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली आहे, तर १२ विद्यार्थ्यांनी ८१% ते ९०% आणि ५ विद्यार्थ्यांनी ७१% ते ८०% गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या यशात विशेष उल्लेखनीय कामगिरी म्हणजे शिवांशु जाधव याने ९८% गुण मिळवत माढा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला असून शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेतील सुसज्ज व तंत्रस्नेही वर्गखोल्या, अनुभवी व समर्पित शिक्षकवर्ग, आधुनिक अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर दिला जाणारा विशेष भर हे घटक ठळकपणे दिसून येतात.
या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अमोल सुरवसे यांनी विद्यार्थ्यांचे, पालकांचे व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
या उल्लेखनीय निकालामुळे आदर्श पब्लिक स्कूलचा नावलौकिक अधिकच वृद्धिंगत झाला असून परिसरात सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
ग्रामीण भागात असूनही आमच्या विद्यार्थ्यांनी CBSE परीक्षेत मिळवलेले हे यश अत्यंत अभिमानास्पद आहे. या निकालामागे विद्यार्थ्यांची जिद्द, शिक्षकांचे अथक परिश्रम आणि संस्थेचे सातत्यपूर्ण प्रयत्न यांचा मोठा वाटा आहे.
खरं तर, गुणवत्तापूर्ण CBSE शिक्षणासाठी बाहेर जाण्याची गरज नाही, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे. आमच्या परिसरातील विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे यावे आणि याच ठिकाणी दर्जेदार शिक्षण घेऊन यश संपादन करावे, हाच आमचा संदेश आहे.”




















