सोलापूर -पुणे येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १६ वर्षाखालील साखळी क्रिकेट स्पर्धेत सोलापूरच्या संघाने आपली चमक दाखवत जालना जिल्हा संघावर पहिल्या डावातील ६५ धावांच्या आघाडीवर विजय मिळवला. या विजयासह सोलापूरने महत्त्वाचे तीन गुण आपल्या खात्यात जमा केले आहेत. सोलापूरने सलग दुसरा विजय नोंदविला आहे.
सोलापूरचा कर्णधार संदेश गाडे याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. संदेशने मैदानावर चौफेर फटकेबाजी करत १४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १०१ धावांचे दिमाखदार शतक ठोकले. त्याला आदित्य माने याने अवघ्या ४५ चेंडूत ६५ धावांची आक्रमक साथ दिली. सार्थक कन्ना (३३) आणि मयंक पात्रे (३४) यांच्या उपयुक्त योगदानामुळे सोलापूरचा पहिला डाव २८६ धावांवर मर्यादित राहिला. जालनाकडून अबू सय्यदने सर्वाधिक ४ बळी घेतले.
—–
सोलापूरच्या गोलंदाजांचा मारा
प्रत्युत्तरात फलंदाजीला उतरलेल्या जालना संघाचा पहिला डाव सोलापूरच्या अचूक माऱ्यासमोर अवघ्या १२८ धावांत आटोपला. सोलापूरकडून ऋग्वेद पाटील आणि फरहान सय्यद यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले, तर श्रवण माळीने २ बळी मिळवत जालन्याची कंबरडी मोडली.
पहिल्या डावात मोठी आघाडी मिळाल्याने सोलापूरने जालन्याला ‘फॉलोऑन’ दिला. दुसऱ्या डावात जालन्याने सावध खेळ करत ६ बाद १८८ धावा केल्या. मात्र, खेळ संपला तेव्हा सोलापूरला पहिल्या डावातील ६५ धावांच्या आघाडीच्या जोरावर विजयी घोषित करण्यात आले.
दोन्ही डावात सातत्यपूर्ण गोलंदाजी करत महत्त्वाचे गडी बाद करणाऱ्या सोलापूरच्या श्रवण माळीला ‘सामनावीर’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.





















