बार्शी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आगळगांव (मुले) येथे विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणाला चालना देण्यासाठी कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीकडून दोन संगणक संच (कॉम्प्युटर) भेट देण्यात आले.
या संगणक संचांच्या मदतीने विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळणार असून, ई -लर्निंगद्वारे शिक्षण अधिक प्रभावी आणि आकर्षक होणार आहे. शाळेतील शिक्षकांनी सांगितले की, या उपक्रमामुळे मुलांची संगणकाबद्दलची आवड वाढेल आणि त्यांच्या कौशल्य विकासाला मोठी मदत होईल.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामस्थ तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. कंपनीच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वस्तरांतून स्वागत करण्यात आले असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
यावेळी कार्यक्रमास शिक्षण विस्तार अधिकारी बावकर, केंद्रप्रमुख पांडुरंग बनसोडे, शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता थोरात, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमित थिटे, उपाध्यक्ष सौ.शिलेखा ओमन, सर्व शिक्षक तसेच पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

















