टेंभुर्णी : माऊली शिक्षण संस्थेच्या सनराइज इंग्लिश मीडियम गुरुकुल स्कूल, टेंभुर्णी येथे परिसरातील सीबीएसई इयत्ता दहावी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. योगेश (बाबाराजे) बोबडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, करिअरच्या पूर्वतयारीसाठी विद्यार्थ्यांना बाहेरगावी जाण्याची गरज नसून टेंभुर्णीतच माऊली शिक्षण संस्थेमार्फत सीईटी, जेईई, नीट यांसारख्या स्पर्धा परीक्षांची दर्जेदार तयारी करून दिली जाणार आहे.
यानंतर सनराइज कायझन अकॅडमीचे संचालक श्री. विजय रॉबर्ट यांनी विद्यार्थी व पालकांना विविध शैक्षणिक शाखा आणि भविष्यातील संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळा व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री. योगेश (बाबाराजे) बोबडे, सचिव सौ. सुरजाताई बोबडे, शैक्षणिक संचालिका सौ. शाहिदा पठाण, प्राचार्य श्री. प्रभाकर सर, प्राचार्य श्री. विकास करळे, श्री. विजय रॉबर्ट व त्यांचे सहकारी, तसेच पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अजित घोरपडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. मोनाली अनंतवार यांनी केले.


























