सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाच्या कॉलेज ऑफ फार्मसी येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. अरफा पटेल यांनी प्रस्तावना व स्वागत केले. प्राचार्य डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. विद्यार्थी प्रतिनिधी समर्थ शेरखाने यांनी वार्षिक अहवाल सादर केला.शैक्षणिक, क्रीडा, कला व सांस्कृतिक क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
अतुल कुलकर्णी म्हणाले, समाजात मोठे बदल घडवण्यासाठी मोठी पदे आवश्यक आहेत. प्रशासकीय सेवेसाठी ताणतणाव सहन करण्याची क्षमता, व्यक्तिमत्व विकास आणि विचारसरणी महत्त्वाची आहे. पोलीस सेवा आव्हानात्मक असून विकास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्यास गुन्हे कमी होतात. युवकांनी जलसाक्षरता, वृक्षारोपण, सायबर क्राईम व कौटुंबिक तक्रारींबाबत जागरूक राहावे. मुलींच्या छेडछाड प्रकरणात कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेचे चेअरमन राजशेखर शिवदारे यांच्या हस्ते माजी विद्यार्थी रमेश होनराव यांचा महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. प्रा. भीमाशंकर शेटे यांनी अवांतर वाचनाचे महत्त्व सांगितले.
आभार प्रदर्शन बाबुराव चांदकवठे यांनी केले.
























