कुर्डूवाडी – सीना माढा उपसा सिंचन योजना व्यवस्थितपणे अगोदरपासूनच अधिकाऱ्यांकडून शिस्तीत चालवली असती तर आजची परिस्थिती निर्माण झाली नसती. राज्यातील मेट्रोलॉजी विभागाकडील अहवालानुसार येथून पुढे तीन वर्ष दुष्काळ पडेल असा अंदाज आहे.
या योजनेवरील लाभार्थी गावांना १०० टक्के पाणी पोहोचले पाहिजे.तुम्ही कुणाच्यातरी दबावाखाली काम करत आहे, अजूनही त्या गावात नियमबाह्य पाणी चालू आहे ते अगोदर बंद करा मग या योजनेतील पाण्याबाबतच्या शेतकऱ्यांच्या व गावोगावच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी संपतील,मी कागदोपत्री बोलतोय,वारंवार सांगून जर अधिकारी कामे करीत नसतील तर नागरिकांनी माझ्याशी संपर्क साधा मी दिशा समितीच्या बैठकीत हे जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करतो असे खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी कुर्डूवाडी येथील टंचाई आढावा बैठकीत बोलताना सांगितले.
कुर्डूवाडी पंचायत समितीच्या सभागृहात सोमवारी दुपारी तीन वाजता खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठक संपन्न झाली.यावेळी उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार संजय भोसले,प्रभारी बिडीओ शंकर मिरगणे, उजनी धरणच्या व्यवस्थापक कार्यकारी अभियंता सुचिता डुंबरे,माजी जि.प.सदस्य भारत शिंदे,पं.स.सदस्य पोपट अनपट,विनंती कुलकर्णी,बालाजी पाटील,ॲड बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी प्रथम प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपाआपल्या विभागाचा टंचाई विषयीचा आढावा खा. धैर्यशील मोहिते पाटील यांना सादर केला. त्यानंतर काही गावांच्या सरपंचांनी खा.धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे विविध विषयावर समस्या सादर केल्या. त्यात प्रामुख्याने सीनामाडा उपसा सिंचन योजनेच्या पाण्याबाबत अनेक गावांच्या तक्रारींचा समावेश होता.याबरोबरच जलमिशन योजना व विद्युत वितरणाच्या लाईटबाबत देखील अनेक तक्रारी नागरिकांकडून व्यक्त करण्यात आल्या. यात माढा शहर,लऊळ,कव्हे,मोडनिंब,अंजनगाव,परिते,होळे,कुर्डू, वाकाव,बेंबळे,उजनी(मा),शेवरे,पडसाळी,चिंचोली यासह अनेक गावांच्या तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. यावर खा धैर्यशील मोहिते पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना उभे करून त्याबाबत उत्तरे देण्यास सांगितले.मात्र त्यावर अनेक ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांचे समाधान झाले नाही. त्यावर मला कामे न केल्यास संपर्क करा असे आवाहन त्यांनी केले.पुढे बोलताना खा मोहिते पाटील यांनी सांगितले की जलजीवन मिशनची कामे ही जिल्हा परिषद व महाराष्ट्र प्राधिकरण विभागाकडून करण्यात आली आहेत,त्यात पाच कोटी रुपयांच्या वर काम चालले की ते झेडपीला राहत नाही, त्यामुळे यात अनेक पद्धतीने अनियमता करण्यात आली त्यामुळे नागरिकांनी सजग असणे गरजेचे आहे,त्यात अनेक वस्त्या स्थानिक राजकारणामुळे वगळल्या आहेत, त्याचा फटका तीस वर्ष बसणार आहे,मी त्याच कमिटीवर आहे,या कामात देशभरात अनियमितता दिसून आली आहे,त्याची तपासणी सध्या केंद्राकडून सुरू आहे. सीना माढा उपसा सिंचन योजना बाबत जुन्या रिटायर झालेली माणसे देखील आताच्या अधिकाऱ्यांना गुदगुल्या करतात,त्यामुळे महसूल विभागाची जबाबदारी आहे की त्यांना सहकार्य करावे, या योजनेतील सर्वांना पाणी व्यवस्थित मिळण्यासाठी पाणी संस्था उभ्या केल्या पाहिजेत असे त्यांनी सांगितले. यावेळी माढा तालुक्यातील अनेक गावचे सरपंच ग्रामसेवक विविध विभागाचे कर्मचारी अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर सुतार यांनी केले.





















