बार्शी – अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणात बार्शी येथील सत्र न्यायालयाने आरोपीस कठोर शिक्षा सुनावली आहे. लखन ऊर्फ बापू जोतीबा सावंत (वय २९, रा. सिद्धार्थनगर, माळशिरस, जि. सोलापूर) यास न्यायालयाने दोषी ठरवत २० वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
प्राप्त माहितीनुसार, दि. १ जानेवारी २०२४ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी घरी झोपलेली असताना आरोपीने घरात शिरुन तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर पीडितेने आईला माहिती दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी (दि. २ जानेवारी २०२४) कुडूवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. घटनेनंतर गावकऱ्यांनी आरोपीस ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले होते.
या प्रकरणी कुडूवाडी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७६(२) तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) २०१२ मधील कलम ४, ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सखोल तपास करुन सबळ पुरावे गोळा करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सरकार पक्षाच्यावतीने एकूण ८ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. पीडितेने आईला दिलेली माहिती व न्यायालयातील जबाब एकमेकांना पूरक असल्याचे स्पष्ट झाले. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष व घटनेनंतर आरोपीला पकडणाऱ्या गावकऱ्यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.
सरकार पक्षाचे वकील ॲड. दिनेश देशमुख यांनी प्रभावी युक्तिवाद करत आरोपीविरुद्ध ठोस पुरावे मांडले. फिर्यादी व साक्षीदारांचा आरोपीशी कोणताही वैमनस्य नसल्याने खोटा गुन्हा दाखल होण्याची शक्यता नसल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. व्ही. के. मांडे यांनी आरोपीस दोषी ठरवत खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली आहे. भादंवि कलम ३७६(२) : २० वर्षे सश्रम कारावास + रु. ५,००० दंड, POCSO कलम ४ : २० वर्षे सश्रम कारावास + रु. ५,००० दंड, POCSO कलम ८ : ३ वर्षे सश्रम कारावास + रु. २,००० दंड, POCSO कलम १२ : ३ वर्षे सश्रम कारावास + रु. २,००० दंड. दंड न भरल्यास अतिरिक्त कारावासाची तरतूद करण्यात आली असून, सर्व शिक्षा एकत्र भोगण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी केला. तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा (करमाळा उपविभाग) व पोलीस निरीक्षक अतुल मोहिते यांनी फिर्यादी व साक्षीदारांना मार्गदर्शन केले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून योगेश मंडलिक यांनी काम पाहिले.






















