सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव करत, त्यांच्या 301व्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरात भव्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे यंदा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती महामंडळाचा कारभार महिलांच्या हाती देत एक सकारात्मक आणि प्रेरणादायी पाऊल उचलण्यात आले आहे.
सोलापूर–पुणे रोडवरील हॉटेल सातबारा येथील गार्डन लॉनमध्ये झालेल्या बैठकीत उत्सवाध्यक्षपदी मनीषा माने तर कार्याध्यक्षपदी किरण माशाळ यांची एकमताने निवड करण्यात आली. याचबरोबर नव्या कार्यकारिणीचीही घोषणा करण्यात आली असून सातपुते व शशिकलाताई कस्पटे यांची उपाध्यक्षपदी, नीता बघेल यांची सचिवपदी, बंडगर ताई यांची सहसचिवपदी, निमिषा वाघमोडे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. तसेच सुमन ताई मुदल्यावर व रेवतीताई मुदलियार यांची मार्गदर्शिका म्हणून निवड करण्यात आली आहे.
बैठकीची सुरुवात अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते अर्जुन सलगर, महापालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे आदी मान्यवर उपस्थित होते.अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कारकिर्दीत न्यायप्रिय, लोकाभिमुख आणि धर्मनिरपेक्ष प्रशासनाची उंच परंपरा निर्माण केली. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी शेखर बंगाळे, प्रा. देवेंद्र मदने, उमेश कोळेकर, राज बंडगर, राम वाकसे, उमेश काळे, मनोज सलगर, डी. डी. पांढरे, केदार पुजारी, विनोद मोठे, अमर दुधाळ यांच्यासह अहिल्या भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.



























