सदाशिवनगर – मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या पानीव (ता. माळशिरस) येथील युवकाचा नीरा उजवा कालव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आकाश सतीश मदने (वय २२) असे मृत युवकाचे नाव असून, बुडणाऱ्या मित्राला वाचवताना त्याने स्वतःचा जीव गमावला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आकाश मदने व त्याचे चार मित्र बुधवार, दि. ६ मे रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास निकमवाडी ( खुड्स ) येथील नीरा उजवा कालवा येथे पोहण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या मित्रांपैकी एक जण पाण्याच्या जोरदार प्रवाहात बुडू लागला. प्रसंगावधान राखत आकाशने तत्काळ पाण्यात उडी घेत मित्राला सुरक्षितपणे तटावर आणले. मात्र, त्यानंतर स्वतः दमल्यामुळे तो पाण्यात बुडाला.
ही घटना लक्षात येताच पानीव परिसरातील तसेच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली; मात्र आकाशचा शोध लागला नाही. अखेर गुरुवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या दरम्यान ७७ चौकी परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला.
आकाशच्या दुर्दैवी निधनामुळे पानीव गावावर शोककळा पसरली असून, अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

























