बार्शी – तालुक्यातील दडशिंगे येथील कु. प्रियंका गोरख गोसावी हिने नुकत्याच झालेल्या इयत्ता बारावी परीक्षेत तब्बल ८९.३३% गुण मिळवून महाविद्यालयात दुसरा क्रमांक पटकवला आहे. प्रियांकाचे वडील गोरख गोसावी हे खाजगी ड्रायव्हर म्हणून बार्शीत काम करतात. पण प्रियांकाने आपल्या अभ्यासातून आणि गुणातून कष्टाचे चीज केले आहे.
इयत्ता बारावीचा निकाल यंदा टफ लागला असल्याचे सर्वजण सांगतात आणि अशा निकालात ही ८९.३३% मिळवणं ही केवळ टक्केवारी नाही, तर एका मध्यमवर्गीय स्वप्नांची उंच भरारी आहे.
कु. प्रियंका गोरख गोसावी ही महाराष्ट्र उच्च माध्यमिक विद्यालयात शास्त्र विभागात शिक्षण घेत होती, अतिशय सामान्य कुटुंबातून व प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत असताना बारावी परीक्षेमध्ये तिने महाराष्ट्र उच्च माध्यमिक विद्यालयात ८९.३३% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला. तिच्या या यशाबद्दल स्वतः हभप जयवंत बोधले महाराज यांनी फोनवरुन कौतुक करत शुभेच्छा दिल्या तर श्री सद्गगुरु बोधराज भक्त मंडळाच्यावतीने प्रा. विलास जगदाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मंडळाचे सोमनाथ ढगे, पप्पू ढगे, चिंतामणी आण्णा, उद्योजक महेश यादव, ऍड. पी. बी. काटमोरे, श्रीकांत शिंदे आदी सदस्य उपस्थित होते. कु. प्रियंकाच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

























