सोलापूर – माजी महापौर महेश कोठे यांच्या निधनानंतर शहराच्या राजकारणात शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे आणि शिवसेना गटनेते अमोल शिंदे यांच्यातील राजकीय दुरावा सातत्याने चर्चेत राहिला होता. एकेकाळी एकाच प्रभागातून निवडून आलेले आणि जवळचे मित्र मानले जाणारे हे दोन्ही नेते पुढे राजकीय प्रतिस्पर्धी बनल्याचे चित्र पाहायला मिळाले.
२०१७ च्या महापालिका निवडणुकीनंतर शहराच्या राजकारणात भाजपचे वर्चस्व प्रस्थापित झाले. भाजपचे तब्बल ८७ नगरसेवक निवडून आले होते. तर काँग्रेसचे केवळ दोन आणि शिवसेनेचे काहीच सदस्य निवडून आले. मात्र संख्याबळ कमी असूनही शिवसेनेचे अमोल शिंदे आणि काँग्रेसचे चेतन नरोटे यांनी सत्ताधारी भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेत स्वतःची वेगळी छाप निर्माण केली होती.
विशेषतः शिवसेना गटनेते अमोल शिंदे यांनी विविध मुद्द्यांवरून आमदार देवेंद्र कोठे यांच्यावर थेट टीका करत राजकीय वातावरण तापवले होते. अनेकदा दोन्ही नेत्यांतील संघर्ष आणि शाब्दिक चकमकी शहराच्या राजकारणाचा चर्चेचा विषय ठरल्या होत्या.
दरम्यान, सोलापुरातील एका विवाह सोहळ्यात
आमदार देवेंद्र कोठे आणि अमोल शिंदे एकाच मंचावर आले. यावेळी दोघांनी हातात हात घालून नवदांपत्यासोबत फोटो काढला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून शहराच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. विवाह सोहळ्यात उपस्थित असलेल्या नागरिकांनाही दोन्ही नेत्यांना एकत्र पाहून आश्चर्याचा धक्का बसला. दीर्घकाळ राजकीय विरोधात उभे ठाकलेले हे नेते एका फ्रेममध्ये दिसल्याने “राजकारणात काहीही कायम नसते” याची पुन्हा एकदा प्रचिती आल्याची चर्चा रंगू लागली आहे.

















