सोलापूर : चेहऱ्यावर हास्य आणि सादरीकरणात आश्चर्याची जादू निर्माण करत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे युवा कलाकार साईराज मिर्जी यांनी आपल्या वेगळ्या कलेमुळे रसिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. जादू आणि व्हेंट्रिलोक्विझम (बोलक्या बाहुल्यांची कला) यांचा सुंदर संगम साधत त्यांनी स्वतःची खास शैली विकसित केली आहे.
वेल्लोर विद्यापीठातून एम.टेक शिक्षण पूर्ण करून सुवर्णपदक पटकावलेल्या साईराज मिर्जी यांनी करिअरसोबत कलेची ओळखही जपली आहे. आपल्या वेगळ्या सादरीकरण शैलीमुळे आणि कलेवरील प्रेमामुळे त्यांनी रसिकांच्या मनात आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. लहानपणापासूनच जादू आणि रंगमंचाची आवड असलेल्या साईराज यांनी ही कला आपल्या वडिलांकडून ज्येष्ठ जादूगार गुरुराज कृष्णाजी मिर्जी यांच्याकडून आत्मसात केली. घरातूनच मिळालेल्या कलेच्या वारशामुळे त्यांनी या दोन्ही कलांमध्ये सातत्याने सराव करत प्रावीण्य मिळवले. सध्या पुण्यातील एका मल्टिनॅशनल कंपनीत कार्यरत असलेले साईराज विकेंडला पुणे, सोलापूर व परिसरात विविध शाळा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांमध्ये आपली कला सादर करतात. नोकरीसोबत कलेची जपणूक करण्याचा त्यांचा प्रयत्न अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
त्यांच्या जादूच्या प्रयोगांमध्ये केवळ करमणूक नसून प्रेक्षकांना काही क्षणांसाठी वेगळ्याच आनंददायी विश्वात नेण्याची ताकद आहे. विनोदी शैली, सहज सादरीकरण आणि प्रेक्षकांशी साधलेला संवाद यामुळे त्यांचे प्रत्येक सादरीकरण अधिक रंगतदार ठरते. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातील प्रेक्षक त्यांच्या प्रयोगांचा आनंद घेतात. त्याचबरोबर बोलक्या बाहुल्यांचे सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरते. बाहुल्याच्या निरागस संवादातून आणि जिवंत अभिनयातून प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध होतात.
ओठ न हलवता बाहुल्याद्वारे संवाद साधण्याची कला
ओठ न हलवता बाहुल्याद्वारे संवाद साधण्याच्या या अनोख्या कलेने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये या कलेबद्दल मोठे आकर्षण दिसून येते. आजच्या काळात दुर्मिळ होत चाललेल्या या कलेला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी साईराज सातत्याने प्रयत्नशील आहेत. लोकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे आणि कलेचे जतन करणे, हेच खरे समाधान, असे
कलाकार साईराज मिर्जी सांगितले.


























