सोलापूर – छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्र, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर, सोलापूर चेस अकॅडमी तसेच चॅम्प चेस स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षाखालील जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेत मानस व सृष्टी गायकवाड या बंधु-भगिनींनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर विजेतेपद प्राप्त केले.
अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय खेळाडू मानस गायकवाड याने सात पैकी सात गुण प्राप्त करत विजेतेपद पटकाविले तर मुलींच्या गटात आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त सृष्टी गायकवाड हिने उत्कृष्ट खेळ करत पाच पैकी साडेचार गुण मिळवून तसेच टायब्रेकमध्ये सरस बोकोल्स गुणपद्धतीच्या आधारे विजेतेपद व आकर्षक चषक पटकाविला.
श्रेयस कुदळे, अधिराज म्हेत्रे व देवदत्त पटवर्धन यांचे प्रत्येकी सहा गुण झाल्यामुळे टायब्रेकमध्ये बोकोल्स गुणपद्धतीवर अनुक्रमे दुसरा, तिसरा व चौथा क्रमांक प्राप्त झाला. मुलींच्या गटात आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वराली हातवळणे हिने ४.५ गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर बार्शीची आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त अनन्या उलभगत व राष्ट्रीय खेळाडू सान्वी गोरे यांनी प्रत्येकी चार गुणांसह तिसरा व चौथा क्रमांक पटकावित सोलापूर जिल्हा संघातील स्थान निश्चित केले. या चौघींचीही निवड पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.
विविध वयोगटात मुलांमध्ये श्लोक चौधरी, नैतिक होटकर, आयुष बदवणे तसेच मुलींमध्ये मंगळवेढ्याची संस्कृती जाधव, बार्शीची पृथा ठोंबरे व ज्ञानदा सांगुळे यांनी आकर्षक खेळ करत अनुक्रमे १४, ११ व ८ वर्षांखालील गटांचे जेतेपद मिळविले.
छत्रपती शिवाजी प्रशाला व ज्युनिअर आणि सिनियर नाईट कॉलेज येथील राजर्षी शाहू सभागृहात संपन्न झालेल्या या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे प्रो-कुलगुरू लक्ष्मीकांत दामा अध्यक्षस्थानी होते. तरुण भारतचे वृत्तसंपादक व विद्यापीठाचे सिनेट सदस्य अजित संगवे, टाटा मोटर्सचे जनरल मॅनेजर विकास गायकवाड, स्पर्धेचे संयोजक तथा विद्यापीठ सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राचे अध्यक्ष प्रा. सचिन गायकवाड, आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक व आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड, राष्ट्रीय पंच संतोष पाटील, अतुल कुलकर्णी तसेच वरिष्ठ राष्ट्रीय पंच उदय वगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय मनोगतात लक्ष्मीकांत दामा यांनी बुद्धिबळाचे महत्त्व खेळाडू व पालकांना विषद करत खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल यश संपादन करून सोलापूरचा नावलौकिक वाढवावा, असे प्रतिपादन केले. विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक व पदके देऊन गौरविण्यात आले.
विजेत्या खेळाडूंचे सोलापुर डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, सोलापूर चेस अकॅडमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर, नामवंत उद्योजक रवींद्र जयवंत, नितीन काटकर, प्रशांत गांगजी, गोपाळ राठोड आदींनी अभिनंदन केले.
*अंतिम निकाल (अनुक्रमे १ ते ५ क्रमांक, गुण व बोकोल्स गुणांसह):*
१९ वर्षे वयोगट (खुला): मानस गायकवाड – ७, श्रेयस कुदळे- ६ (३३.५), अधिराज म्हेत्रे- ६ (२९), देवदत्त पटवर्धन- ६(३१.५), नागेश राजमाने- ५
*१४ वर्षे वयोगट मुले:* श्लोक चौधरी – ६, आयुष जानगवळी- ५ (२९.५), युवराज गायकवाड- ५ (२९), श्रेयस कंदीकटला- ५ (२६.५), नमन रंगरेज- ५ (२४)
*११ वर्षे वयोगट मुले:* नैतिक होटकर – ५ (३०), मयूर स्वामी- ५ (२८), श्रेयश इंगळे- ५ (२६.५), हिमांशू व्हनगावडे- ५ (२५), ओम राऊत- ४.५
*८ वर्षे वयोगट मुले:* आयुष बदवने- ४.५, कृष्णराज पटाले- ४, अद्विक ठोंबरे- ३ (१९), विराज शेंडगे- ५, ३ (१८.५), ओम सारवडकर- ३(१७.५)
*१९ वर्षे वयोगट मुली:* सृष्टी गायकवाड – ४.५ (१५), स्वराली हातवळणे- ४.५ (१४.५), अनन्या उलभगत- ४ (१३), सान्वी गोरे-४ (१२.५), साक्षी पाटील- ३
*१४ वर्षे वयोगट मुली:* संस्कृती जाधव- ३.५, ओजस्वी बोराळे- ३ (१३), दूर्वा महिंद्रकर- ३ (११.५), श्रेया शिंदे- २ १०), आद्या कुमार- २ (९)
*११ वर्षे वयोगट मुली:* पृथा ठोंबरे- ३.५, मनस्वी क्षीरसागर- ३, आर्वी सदाफुले – २ (१२), रूही दलाल – २ (८.५)
*८ वर्षे वयोगट मुली:* ज्ञानदा सांगुळे- ३, त्रिशा पडुळे- २ (१३), ईशा पटवर्धन- २ (११.५), अधिरा रोकडे- २ (९.५), शार्वी गांधी- १
*फोटो ओळी:* विजेत्या खेळाडूंसमवेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे प्रो-कुलगुरू लक्ष्मीकांत दामा अध्यक्षस्थानी होते. तरुण भारतचे वृत्तसंपादक व विद्यापीठाचे सिनेट सदस्य अजित संगवे, टाटा मोटर्सचे जनरल मॅनेजर विकास गायकवाड, स्पर्धेचे संयोजक तथा विद्यापीठ सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राचे अध्यक्ष प्रा. सचिन गायकवाड, आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक व आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड, संतोष पाटील, उदय वगरे आदी.


























