सोलापूर – मित्राला भेटण्यासाठी सोलापूर कडे निघालेला एक 34 वर्षीय दुचाकी स्वार 4 चाकी वाहनाच्या धडकेत जागीच ठार झाल्याची घटना जुना पुना नाका ब्रिजवर आज बुधवारी दुपारी साडेतीन वाजता घडली.
महारुद्र रामा आवताडे (वय 34 वर्ष, रा. सावरगाव, तालुका तुळजापूर )असे त्या मयत दुचाकी स्वाराचे नाव आहे. आज तुळजापूरहून तो चुलत्याला भेटण्यासाठी बाळे येथे आला होता . मात्र दुपारी मित्राचा फोन आल्यावर तो घरी सांगून मित्राला भेटण्यासाठी सोलापूरकडे मोटरसायकल वरून निघाला असताना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्याच्या दुचाकीला पाठीमागून एका वाहनाने जोरात धडक दिली . या धडकेत तो गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडला . यादरम्यान घटनास्थळाकडून सोलापूरकडे एक रुग्णवाहिका येत होती .त्याला थांबवून त्यातच या महारुद्र अवताडे चा मृतदेह घालून येथील शासकीय रुग्णालयात सायंकाळी पाच वाजता दाखल केला .
चौकट – महारुद्र हा अविवाहित असून तो सेंट्रींग मिस्तरी चे काम करायचा . त्याच्या लग्नासाठी स्थळ बघण्याचे काम घरच्यांकडून सुरू होते .त्याच्या पश्चात वडील , एक भाऊ बहीण असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली .


























