सांगोला – माजी नगराध्यक्ष व सां.ता.शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त ३ दिवस रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे हे २३ वे वर्ष असून, दरवर्षी १००० पेक्षा जास्त रक्तदाते या मानवतेच्या कार्यात सहभागी होतात. एप्रिल आणि मे महिन्यात कडक उन्हाळ्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होतो.
सुट्यांचा काळ आणि वाढत्या अपघातांमुळे रक्ताची निकड भासत असताना थॅलसेमिया, डायलिसिस आणि शस्त्रक्रिया असलेल्या रुग्णांना रक्तासाठी धावपळ करावी लागते. हीच सामाजिक गरज ओळखून रक्तदान हेच श्रेष्ठ दान या भावनेतून सांगोला तालुक्यातील विविध ठिकाणी या शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे. तरी सांगोला शहर व तालुक्यातील सर्व शैक्षणिक, साहित्यिक, राजकीय, सामाजिक व सेवाभावी संस्थांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करून मानवतेचे महान कार्य करावे, असे आवाहन विद्यामंदिर परिवार व लायन्स क्लब सांगोला यांच्या वतीने करण्यात येत आहे.
रक्तदान शिबिरांचे स्थळ-
बुधवार दि.२० मे लोणविरे हायस्कूल लोणविरे,
गुरुवार दि.२१ मे नाझरा विद्यामंदिर प्रशाला नाझरा,
शुक्रवार दि.२२ मे पांडुरंग कॉम्प्लेक्स कोळा, जि.प.मुलींची शाळा नं.१ सांगोला.
वेळ- सर्व ठिकाणी सकाळी ८ ते सायं.६ पर्यंत राहील.


























