सांगोला – भारत सरकारच्या वतीने संपूर्ण देशामध्ये जनगणना २०२७ या राष्ट्रीय मोहिमेचा शुभारंभ दि.१६ मे पासून होत आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात दि.१६ मे पासून घर यादी व घर गणना करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय कार्यात सांगोला शहरातील सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून प्रगणकाना अचूक माहिती द्यावी असे आवाहन जनगणना चार्ज अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी केले आहे.
सांगोला शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या कुटुंबाची, घराची आणि सुविधांची माहिती अचूक व पूर्णतः सत्य द्यावी. तसेच आपल्या घरी येणाऱ्या प्रगनकांनी विचारलेल्या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे देऊन सहकार्य करावे. प्रगणक हे शासकीय ओळखपत्र धारण केलेले असतील. जनगणना करण्यासाठी दिलेली माहिती ही पूर्णतः गोपनीय ठेवली जाते व तिचा वापर सांख्यिकीय हेतूसाठी केला जातो. त्यामुळे कोणताही संकोच न बाळगता माहिती द्यावी. यावेळच्या जनगणनेत प्रगणकाकडून विचारल्या जाणाऱ्या ३४ प्रश्नांची उत्तरे देणे नागरिकांवर बंधनकारक आहे. तसेच दि.१ ते १५ मे या दरम्यान ज्यांनी स्वगणना केलेली आहे. अशा नागरिकांनी त्यांना प्राप्त झालेला एस ई आयडी क्रमांक आपल्या घरी आलेल्या प्रगणक यांना देण्यात यावा असे आवाहन डॉ.सुधीर गवळी यांनी केले आहे .
जनगणनेत खोटी उत्तरे, माहितीस नकार दिल्यास अदखलपात्र गुन्हा
जनगणना प्रगनकांना माहिती देण्यास टाळा करणे किंवा चुकीची माहिती देणे आता महागात पडू शकते. जनगणना कायदा १९४८ नुसार प्रत्येक नागरिकांनी अचूक माहिती देणे हे कायदेशीर बंधन असून यात कसूर केल्यास दंडात्मक आणि कायदेशीर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.
– डॉ.सुधीर गवळी, जनगणना चार्ज अधिकारी

























