सोलापूर – ‘बाटू’ तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठ लोणेरे रायगड याचे कार्यक्षेत्र अंतर्गत सोलापूर विभागीय क्रीडा स्पर्धेस ९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून या स्पर्धा येथील ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयात होणार आहेत.
‘बाटू’ विद्यापीठाची क्रीडापरिषद ऑर्किड महाविद्यालयात संपन्न झाली. याचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र असून यामध्ये अभियांत्रिकी तसेच फार्मसी महाविद्यालयाचा समावेश आहे. या विद्यापीठांतर्गत सोलापूर विभागामध्ये सोलापूर, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिव या पाच जिल्ह्यांचा समावेश असून या विभागाची वार्षिक क्रीडा स्पर्धा नियोजनाची क्रीडा परिषद प्राचार्य बी. के. सोनगे यांच्या अध्यक्षतेखाली उपप्राचार्य श्रीनिवास मेतन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. मागील वर्षभरात झालेल्या विविध स्पर्धांचे इतिवृत्त तसेच यावर्षी होणाऱ्या स्पर्धांचे नियोजन याबाबत या पाच जिल्ह्यांमधून विविध महाविद्यालयांतून आलेल्या क्रीडा समन्वयक, शारीरिक शिक्षण संचालक आणि विभाग प्रमुख यांच्यामध्ये झालेल्या चर्चेतून आराखडा तयार करण्यात आला. मागील वर्षी उत्कृष्ट स्पर्धांचे नियोजन करणाऱ्या विविध महाविद्यालयांचे झोनल समिती चेअरमन प्राचार्य बी. के. सोनगे यांनी अभिनंदन केले. त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ‘अभियांत्रिकी महाविद्यालयात असणारे विद्यार्थी बौद्धिक दृष्ट्या निर्णयक्षम असतात, त्याला क्रीडा क्षेत्राची मजबूत जोड मिळाल्यास मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या हे विद्यार्थी सक्षम होतील. अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडूंमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे नावाजलेले खेळाडू अभियांत्रिकी क्षेत्रातील असल्याचे दिसून येते, याचाच आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा.’
यावेळी उपप्राचार्य मेतन यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य सचिन गायकवाड यांनी क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपायांवर चर्चा केली. झोन अंतर्गत नवीन सात क्रीडा प्रकारांचा समावेश करण्याचा ठराव घेण्यात आला. यामध्ये महिला क्रिकेट, लॉन टेनिस, कराटे, हँडबॉल, योगा, वेटलिफ्टिंग, ज्युडो यांचा समावेश असून स्पर्धेसाठी येणाऱ्या खर्चाच्या रकमेत ५० टक्के वाढ करण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. यावेळी निवड समिती व स्पर्धा नियोजन समितीचे प्रा. शिवशरण कोरे, प्राध्यापक देशमुख, प्राध्यापक बामने, प्रा. मनोज राठोड, प्रा. कोकाटे, प्रा. धाकपडे, प्रा. वगरे, प्रा. कदम, प्रा. जडगे आणि प्रा. बिदरकोटे उपस्थित होते.
——
विभागीय स्पर्धा निश्चित केलेली यजमान महाविद्यालये
बुद्धिबळ (ऑर्किड महाविद्यालय, सोलापूर), व्हॉलीबॉल (लातूर), बॅडमिंटन (वडाळा, सोलापूर ), खो-खो (ए. जी. पाटील, सोलापूर), ॲथलेटिक्स (कर्मयोगी शेळवे, पंढरपूर), कबड्डी (फॅबटेक, सांगोला), क्रिकेट (नांदेड), फुटबॉल (ऑर्किड,सोलापूर), बास्केटबॉल (तेरणा धाराशिव), टेबल टेनिस (अकलूज).
——-
























