
जालना : माय भारत जालना व युवा बहुद्देशीय सेवाभावी संस्था, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना येथे तंत्रज्ञान मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रम मयूरकुमार गोरमे, जिल्हा युवा अधिकारी, माय भारत, जालना यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी के. एम. दहाडे, श्याम चव्हाण, हनुमंत मोरे, एस. व्ही. सानप व आनंद पवार हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप संकल्पना तसेच बदलत्या तांत्रिक युगातील रोजगाराच्या संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
तंत्रज्ञानाचा वापर केवळ शिक्षणापुरता मर्यादित न ठेवता दैनंदिन जीवन, उद्योग, शेती आणि सामाजिक विकासासाठीही प्रभावीपणे करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. युवकांनी नव्या तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करून स्वावलंबी बनावे तसेच डिजिटल क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करावी, असे आवाहनही उपस्थित मार्गदर्शकांनी केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध तांत्रिक विषयांवर प्रश्न विचारून संवाद साधला. यामुळे कार्यक्रम अधिक ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरला. उपस्थित विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष जयपाल राठोड, मुकेश सपकाळे, काझी मॅडम, अजित गावंडे, नयनतारा कचरे तसेच शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















